आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अनेक फलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली आहे आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम अजूनही भारताच्या महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावार आहे. तर, टी२० क्रिकेटमध्ये विराटने सर्वाधिक धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपांबाबत पाहायचे झाले तर, आतापर्यंत १२ फलंदाजांनी २० हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये फक्त ५ फलंदाज असे आहेत, जे २५ हजार धावांचा आकडा पार करु शकले आहेत. तर, अव्वल क्रमांकावर असणाऱ्या दिग्गजाने चक्क ३० हजार धावांचा पल्ला पार केला आहे. विशेष म्हणजे, हे नाव एका भारतीयाचे आहे.
तर बघूयात, कोण आहेत ते टॉप-५ फलंदाज ज्यांनी कसोटी, वनडे आणि टी२०मद्ये मिळून २५००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
५. जॅक्स कॅलिस
दक्षिण आफ्रिकाचा महान अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक्स कॅलिसने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५१९ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ६२ शतक आणि १४९ अर्धशतक करत एकूण २५५३४ धावा केल्या आहेत. यासह कॅलिस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ५व्या क्रमांकावर आहे.
कॅलिसने १६६ कसोटी सामन्यात ४५ शतक आणि ५८ अर्धशतक करत १३२८९ धावा केल्या होत्या. तर, वनडेत ३२८ सामन्यात १७ शतके आणि ८६ अर्धशतके करत ११५७९ धावा केल्या होत्या. तसेच टी२०त २५ सामन्यात ५ अर्धशतके करत ६६६ धावा केल्या होत्या.
४. माहेला जयवर्धने
श्रीलंकाचा महान फलंदाज माहेला जयवर्धनेने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत १४९ कसोटी सामन्यात ३४ शतके आणि ५० अर्धशतके करत ११८१४ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ७ द्विशतकांचांही समावेश होता. तर, ४४८ वनडे सामन्यात त्याने १९ शतके आणि ७७ अर्धशतके करत १२६५० धावा केल्या होत्या. तसेच, टी२०त ५५ सामन्यात १ शतक आणि ९ अर्धशतकांच्या मदतिने १४९३ धावा केल्या होत्या.
अशाप्रकारे आपल्या क्रिकेट कारकिर्दीत जयवर्धनेने ६५२ सामन्यात २५९५७ धावा केल्या होत्या. यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
३. रिकी पाँटिंग
ऑस्ट्रेलिया माजी कर्णधार आणि महान फलंदाज रिकी पाँटिंग हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे. त्याने १६८ कसोटी सामने खेळत १३३७८ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ६ द्विशतकांचा, ४१ शतकांचा आणि ६२ अर्धशतकांचा समावेश होता. वनडेत त्याने ३७५ सामन्यात ३० शतके आणि ८२ अर्धशतके करत १३७०४ धावा केल्या होत्या. तर, टी२०त १७ सामन्यात त्याने २ अर्धशतके करत ४०१ धावा केल्या होत्या.
अशाप्रकारे, पाँटिंगने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत ५६० सामन्यात २७४८३ धावा केल्या आहेत.
२. कुमार संगाकारा
श्रीलंकाचा महान फलंदाज कुमार संगाकाराने ५९४ आंतरराश्ट्रीय सामने खेळत २८०१६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ६३ शतकांचा आणि १५३ अर्धशतकांचा समावेश आहे. यासह संगाकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करमारा दुसरा फलंदाज आहे.
यात त्याच्या १३४ कसोटी सामन्यातील १२४०० धावा, ४०४ वनडे सामन्यातील १४२३४ धावांचा आणि ५६ टी२० सामन्यातील १३८२ धावांचा समावेश आहे.
१. सचिन तेंडुलकर
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतके करण्याचा विक्रम आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून सचिनने ३० हजार पेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. असे करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याच्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजांने ३० हजार धावांचा टप्पा अद्यापही गाठलेला नाही.
सचिनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत २०० कसोटी सामने खेळत १५९२१ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ६ द्विशतकांचा, ५१ शतकांचा आणि ६८ अर्धशतकांचा समावेश होता. तर, ४६३ वनडे सामने खेळत सचिनने १८४२६ धावा केल्या होत्या. यात त्याच्या एका द्विशतकाचा, ४९ शतकांचा आणि ९६ अर्धशतकांचा समावेश होता. तर, सचिनने टी२०त फक्त १ सामना खेळत १० धावा केल्या होत्या.
अशा प्रकारे सचिनने सर्वाधिक ६६४ सामने खेळत सर्वाधिक ३४३५७ धावा केल्या होत्या.






