जवळजवळ ५० वर्षांचा इतिहास असललेल्या या वनडे क्रिकेटमध्येही गरजेनुसार बदल होत गेले. त्यानुसार हळू-हळू क्रिकेटपटूंनीही त्यानुसार बदल करुन घेतला. अनेक खेळाडूंनी आत्तापर्यंत वनडेत मोठ्या खेळी केल्या आहेत. जिथे शतकही कठीण वाटत होते, तिथे आता खेळाडूंनी दिडशतके-द्विशतके करण्यापर्यंत मजल मारली आहे.
या लेखात आपण अशा ५ फलंदाजांचा आढावा घेणार आहोत, ज्यांनी वनडेत सर्वात जलद म्हणजेच कमी चेंडूत दिडशतक केले आहे.
वनडेत सर्वात जलद दिडशतक करणारे फलंदाज –
५. सनथ जयसुर्या – ९५ चेंडू
श्रीलंकेचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू सनथ जयसुर्याने १ जूलै २००६ ला लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध केवळ ९५ चेंडूत दिडशतकी खेळी केली होती. त्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला मार्कस ट्रेस्कोथिकने केलेल्या १२१ धावांच्या जोरावर ३२१ धावा करत ३२२ धावांचे आव्हान दिले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना जयसुर्याने ९९ चेंडूत २० चौकार आणि ४ षटकारांसह १५२ धावा केल्या होत्या. यावेळी त्याने ९५ चेंडूत त्याचे दिडशतक पूर्ण केले होते. त्यामुळे तो सर्वात जलद दिडशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ५ व्या क्रमांकावर आहे.
त्या सामन्यात सनथ जयसुर्याला उपुल थरंगाने चांगली साथ दिली होती. थरंगाने १०९ धावा केल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेने केवळ ३८ षटकांच्या आतच ३२२ धावांचे आव्हान पार केले होते.
४. ल्यूक राँची – ९२ चेंडू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या ल्यूक राँचीने नंतर न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने २३ जानेवारी २०१५ ला न्यूझीलंडकडून श्रीलंकेविरुद्ध खेळताना ९२ चेंडूत दिडशतक केले होते.
त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून राँची ७ व्या क्रमांकावर खेळायला आला होता. त्यावेळी न्यूझीलंड ५ बाद ९३ अशा अवस्थेत होती. पण त्याने ग्रँट एलिएटला साथीला घेत ९९ चेंडूत नाबाद १७० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १४ चौकार आणि ९ षटकार मारले होते. यावेळी त्याने केवळ ९२ चेंडूत त्याचे दिडशतक पूर्ण केले होते.
न्यूझीलंडने एलिएट(१०४*) आणि राँचीच्या शतकांमुळे ३६० धावा करत श्रीलंकेला ३६१ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला २५२ धावाच करता आल्या.
३. शार्जिल खान – ८५ चेंडू
१८ ऑगस्ट २०१६ ला पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड संघात झालेल्या वनडे सामन्यात पाकिस्तानच्या शार्जिल खानने केवळ ८५ चेंडूत दिडशतक केले होते. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली होती. यावेळी शार्जिलने सलामीला फलंदाजी करताना ८६ चेंडूच १६ चौकार आणि ९ षटकारांसह १५२ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने ८५ चेंडूत दिडशतक केले होते.
त्याच्या या खेळीमुळे पाकिस्तानने ३३७ धावा करत आर्यलंडला ३३८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आर्यंलंडला केवळ ८२ धावाच करता आल्या.
२. शेन वॉट्सन – ८३ चेंडू
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉट्सनने ११ एप्रिल २०११ ला बांगलादेशविरुद्ध केवळ ८३ चेंडूत दिडशतक केले होते. त्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २२९ धावा करत २३० धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला दिले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या वॉट्सनने जवळजवळ प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याता प्रयत्न केला होता. त्याने त्यावेळी ९६ चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकारांसह नाबाद १८५ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने ८३ चेंडूतच दिडशतक पूर्ण केले होते. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने २६ षटकातच २३२ धावा करत ९ विकेट्सने विजय मिळवला होता.
१. एबी डिविलियर्स – ६४ चेंडू
दक्षिण आफ्रिकेचा माजी स्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सच्या नावावर वनडेत सर्वात जलद शतक करण्याबरोबरच जलद दिडशतक करण्याचाही विश्वविक्रम आहे. त्याने सर्वात जलद दिडशतक करण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिज विरुद्ध २०१५ च्या विश्वचषकात केला होता. त्याने केवळ ६४ चेंडूत १५० धावा पूर्ण केल्या होत्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेकडून त्याने ६६ चेंडूत नाबाद १६२ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने १७ चौकार आणि ८ षटकार मारले होते. त्याच्या या खेळीच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेने ४०८ धावा केल्या होत्या आणि वेस्ट इंडिजला ४०९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला १५१ धावाच करता आल्या होत्या.
ट्रेंडिंग लेख –
६०पेक्षा कमी चेंडूत कसोटीत तुफानी शतक करणारे ४ फलंदाज
केवळ आणि केवळ एका धावेमुळे हुकली होती ‘या’ ६ दिग्गज भारतीयांची शतकं
भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारे ५ फलंदाज