इंडियन प्रीमीयर लीग म्हटले की आक्रमक खेळी, जबददस्त क्षेत्ररक्षण, शानदार गोलंदाजी यांची चर्चा होतंच रहाते. प्रत्येक सामन्यागणिक नवीन विक्रम झालेला पहायला मिळतो. त्यातील काही विक्रम तर असे आहेत, ज्यांना मोडणे सध्यातरी कठिण वाटत आहे. अशाच विक्रमांचा घेतलेला हा आढावा –
आयपीएलमधील हे विक्रम मोडणे कठीण –
सर्वाधिक सलग विजय – कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाता नाईट रायडर्सने २०१४-२०१५ च्या मोसमात मिळून सलग १० विजय मिळवले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक सलग विजय मिळवण्याचा विक्रम कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नावावर आहे.
कोलकाताने २०१४ मध्ये पहिल्या ७ सामन्यात केवळ २ सामने जिंकले होते. परंतू त्यांनी त्यानंतर त्यांची कामगिरी सुधारली आणि त्यावर्षी त्यांनी अंतिम सामन्यासह ९ सामने सलग जिंकले. या मोसमाचे विजेतेपद जिंकल्यानंतर त्यांनी २०१५ च्या मोसमातील पहिला सामनाही मुंबई इंडियन्स विरुद्ध जिंकला. त्यामुळे त्यांनी आयपीएलमध्ये सलग १० सामने जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांचा हा विजयी रथ २०१५ ला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्यांना पराभूत करत रोखला.
२. सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन – अल्झारी जोसेफ
२०१९ च्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सचा गोलंदाज अल्झारी जोसेफने सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध खेळताना ३.४ षटके गोलंदाजी करताना १२ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा गोलंदाज ठरला.
त्याने या सामन्यात डेव्हिड वॉर्नर, विजय शंकर, दीपक हुडा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल यांच्या विकेट्स घेतल्या होत्या. हा विक्रम करताना जोसेफने २००८ ला राजस्थानकडून सोहेल तन्वीरने घेतलेल्या १४ धावांतील ६ विकेट्सचा विक्रमही मोडला. विशेष म्हणजे जोसेफचा हा पहिलाच आयपीएल सामना होता.
३. सर्वोच्च वैयक्तिक धावा –
आयपीएलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आक्रमक सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने २०१३ च्या आयपीएल मोसमात पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध ६६ चेंडूत १७ षटकार आणि १३ चौकारांसह १७५ धावांची खेळी केली होती. ही आयपीएलमधील सर्वोच्च धावांची खेळी आहे. त्यावेळी तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळत होता. गेलच्या आसपास मागील ७ वर्षात कोणीही जाऊ शकलेले नाही.
४. सर्वोच्च सांघिक धावसंख्या –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला आत्तापर्यंत जरी आयपीएल विजेतेपद मिळवता आले नसले तरी त्यांच्या संघाने अनेक विक्रम केले आहे. त्यातील एक मोठा विक्रम असा की त्यांनी सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. त्यांनी २३ एप्रिल २०१३ ला पुण वॉरियर्स विरुद्ध ५ बाद २६३ धावा केल्या होत्या.
त्याच सामन्यात गेलने १७५ धावांची खेळी केली होती. तसेच एबी डिविलियर्सने ८ चेंडूत ३१ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्रत्येक षटकामागे जवळजवळ १३ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात पुण्याच्या संघाला केवळ १३३ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे १३० धावांनी पुणे संघ पराभूत झाला होता.
५. निचांकी सांघिक धावसंख्या –
आयपीएलमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम जसा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या नावावर आहे, तसाच निचांकी धावसंख्येचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. २०१७ च्या आयपीएल मोसमात बेंगलोर संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा डाव १३१ धावांवर संपुष्टात आणला होता. पण त्याच सामन्यात कोलकाताच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना बेंगलोरला १० षटकांच्या आत ४९ धावांवर सर्वबाद केले होते. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वात निचांकी धावसंख्येचा नकोसा विक्रमही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या नावावर आहे.