आयपीएलचा कालचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैद्राबाद या संघांमध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने हैद्राबादवर ७ विकेट्सने आरामात विजय मिळविला. हैद्राबादने दिलेले १७२ धावांचे लक्ष्य चेन्नईने १८.३ षटकांतच गाठले. यात सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या ७५ धावा आणि फॅफ ड्यू प्लेसिसच्या ५६ धावा निर्णायक ठरल्या.
या खेळीसह फॅफ ड्यू प्लेसिसने अर्धशतकासह एक विशेष कामगिरी देखील केली. त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दिल्लीच्या शिखर धवनला मागे टाकत अव्वल स्थान गाठले. त्यामुळे आता ऑरेंज कॅपची शर्यत अजूनच चुरशीची झाली आहे. तर पर्पल कॅपच्या शर्यतीत देखील कालच्या सामन्याने एक बदल झाला आहे. या निमित्ताने ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप-५ खेळाडूंचा आपण आढावा घेऊया.
ऑरेंज कॅप –
चेन्नई सुपर किंग्जच्या फॅफ ड्यू प्लेसिसने कालच्या सामन्यात ५६ धावांची खेळी करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थान गाठले. त्याच्या आता ६ सामन्यात २७० धावा आहेत. त्याने मागे टाकल्याने शिखर धवन दुसर्या स्थानी घसरला असून त्याच्या ६ सामन्यात २६५ धावा आहेत. तिसर्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल असून त्याच्या ६ सामन्यात २४० धावा आहेत. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर परदेशी खेळाडूंनी कब्जा केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ग्लेन मॅक्सवेल ६ सामन्यातील २२३ धावांसह चौथ्या स्थानी आहे. तर सनरायझर्स हैद्राबादचा सलामीवीर जॉनी बेअरिस्टो देखील ६ सामन्यात २१८ धावांसह पाचव्या स्थानावर आहे. या पाचही फलंदाजांमधील धावांचे अंतर कमी असल्याने आगामी सामान्यांनुसार यात सातत्याने बदल पाहायला मिळतील.
ऑरेंज कॅप शर्यतीतील टॉप-५ खेळाडू –
१) फॅफ ड्यू प्लेसिस – २७० धावा
२) शिखर धवन – २६५ धावा
३) केएल राहुल – २४० धावा
४) ग्लेन मॅक्सवेल – २२३ धावा
५) जॉनी बेअरिस्टो – २१८ धावा
पर्पल कॅप –
पर्पल कॅपच्या शर्यतीत अद्याप रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या हर्षल पटेलने आपले वर्चस्व कायम राखले आहे. त्याने ६ सामन्यात तब्बल १७ विकेट्स घेत अव्वल स्थानी भक्कम पाय रोवले आहेत. दुसर्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा युवा वेगवान गोलंदाज आवेश खान आहे. त्याने ६ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या आहेत. तिसर्या स्थानावर सनरायझर्स हैद्राबादच्या राशिद खानने झेप घेतली असून त्याच्या ६ सामन्यात ९ विकेट्स आहेत. चौथ्या स्थानावरील मुंबई इंडियन्सच्या राहुल चाहर आणि पाचव्या स्थानावरील राजस्थान रॉयल्सचा ख्रिस मॉरिस यांच्या नावावर देखील ९ विकेट्स आहेत. मात्र सरस इकोनॉमी रेटमुळे राशिद तिसर्या तर राहुल आणि मॉरिस अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप-५ खेळाडू –
१) हर्षल पटेल – १७ विकेट्स
२) आवेश खान – १२ विकेट्स
३) राशिद खान – ९ विकेट्स
४) राहुल चाहर – ९ विकेट्स
५) ख्रिस मॉरिस – ९ विकेट्स
महत्वाच्या बातम्या:
आयपीएल २०२१ : चेन्नई अव्वल, तर हा संघ तळाला, पाहा कशी आहे पॉईंट्स टेबलची स्थिती
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
IPL2021: चेन्नईने सलग पाचवा विजय मिळवताच सोशल मीडियावर पडला मीम्सचा पाऊस, पाहा काही खास प्रतिक्रिया