युएफा चॅम्पियन्स लीगच्या लंडनच्या वेंब्ली स्टेडीयम मध्ये झालेल्या टोट्टेनहॅम हाॅटस्पर विरुद्ध रियल मद्रिद सामन्यात मद्रिदला ३-१ ने पराभव स्वीकारावा लागला. याच आठवड्यातला त्यांचा हा दुसरा पराभव आहे. ला लीगा मध्ये त्यांना गिरोनाने २-१ ने पराभूत केले होते. संघात ११ सर्वोत्कृष्ट खेळाडू असून सुद्धा होणारा पराभव झिनादेन झिदानसाठी चिंतेचा विषय आहे.
पहिल्या हाफच्या सुरुवातिपासून स्पर्सने मद्रिदपेक्षा उत्तम दर्जाचा खेळ दाखवला. बॉलचा ताबा जरी मिळवण्यात मद्रिदला जास्त यश मिळाले असले तरी स्पर्सने बाॅल पासींगने सामना फिरवला. मद्रिदची पासिंग स्पर्सचे पहिले २ गोल होत नाही तोपर्यंत खूप साधारण होती. नंतर इस्को, माॅड्रिक यांनी खेळ सुधारत प्रयत्न केले पण तोपर्यंत वेळ गेली होती.
२७व्या मिनिटाला आलेला क्रॉस पास ट्रिपियरने उत्तम रित्या उजव्या विंगेत घेत त्याला पेनल्टी बॉक्स मध्ये दिला आणि अलीने नाचो आणि गोलकीपरला चकवत पहिला गोल केला. या गोल बरोबरच अली टोट्टेनहॅम हाॅटस्परचा रियल मद्रिद विरुद्ध युरोपियन स्पर्धेत गोल करणारा पहिला खेळाडू झाला.
दुसऱ्या हाफच्या ५५ व्या मिनिटाला परत एकदा डायरने दिलेल्या पासवर अलीने कॅसमिरोला सहज मागे टाकत बाॅल मारला जो सर्जिओ रामोसला लागून डिफ्लेक्ट झाला आणि अलीने टोट्टेनहॅम हाॅटस्परला २-० अशी बढत मिळवून दिली. अवघ्या १० मिनिटानंतर सामन्याच्या ६५ व्या मिनिटाला मद्रिदचा अटॅक वाचवत स्पर्सने काउंटर अटॅक केला. त्यांचा नंबर १ गोल स्कोरर केनने इरिक्सनला पास दिला जो त्याने मद्रिदच्या गोलकीपरला चकवत गोल मध्ये रूपांतरित केला आणि ३-० ने आघाडी मिळवून दिली.
शेवटच्या १० मिनिटात गोल करण्यासाठी प्रसिद्ध मद्रिदने ८० व्या मिनिटला संधी तयार केली, हकिमीचा क्रॉस पेनल्टी बॉक्स मध्ये स्पर्सने आडवला पण तो मार्सेलोच्या ताब्यात आला आणि त्याने मारलेला परत डिफ्लेक्ट होऊन पेनल्टी बॉक्स मध्ये मायोरलकडे आला. जो रोनाल्डोने स्पर्सच्या गोलकीपरला चकवत गोल बॉक्स मध्ये टाकत मद्रिदचा पहिला गोल केला.
या सामन्यानंतर स्पर्स ग्रुप एच मध्ये १ तर मद्रिद २ नंबरला पोहचली आहे.
उर्वरित सामन्यांचे निकाल:
नापोली २-४ मॅन्चेस्टर सिटी
लीवरपुल ३-० मरीबोर
डोर्टमंड १-१ अपोइल
सेव्हीला २-१ स्पार्टक
नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)