आतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने बुधवारी (12 जुलै) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. ऍशेस 2023 मालिकेमुळे आयसीसी क्रमवारीत मागच्या काही आठवड्यांपासून सतत फेरबदल होताना दिसले आहेत. मागच्या वेळी फायद्यात असणाऱ्या स्टीव स्मिथला या आठवड्यात नुकसान सोसावे लागले आहे. पण त्याचाच सहकाही ट्रेविस हेड याने मात्र कसोटी क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडचा केन विलियम्सन (Kane Williamson) आहे. विलियम्सनकडे 883 गुण असून त्याने यावेळीही आपला पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे. ट्रेविस हेड मात्र अशीच कामगिरी करत राहिला, तर तो लवकरच सर्वोत्तम कसोटी फलंदाज बनू शकतो. हेडकडे सध्या 874 गुण असून त्याने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. विलियम्सनला पछाडण्यासाठी त्याला अजून 10 गुणांची आवश्यकता आहे. विलियम्सन दुखापतीमुळे मागच्या काही महिन्यांपासून मैदानात दिसला नाहीये. त्याला पुनरागमनासाठीही अजून वेळ लागणार आहे. अशात त्याच्याकडून क्रमवारीतील पहिला क्रमांक लवकरच जाणार, असेच दिसते.
दरम्यान, हेडने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियासाठी महत्वपूर्ण खेळी केली होती. संघ अडचणीत असताना हेड पहिल्या डावात 39, तर दुसऱ्या डावात 77 धावांची खेळी करू शकला होता. पण ऑस्ट्रेलियाने या सामन्यात तीन विकेट्सने पराभव स्वीकारला होता. ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथ (Steve Smith) मात्र या सामन्यात अपयशी ठरल्याचे दिसले. स्मिथने या सामन्यातील पहिल्या डावात 22, तर दुसऱ्या डावात 2 धावा केल्या. या सुमार प्रदर्शनाचे नुकसान ऑस्ट्रेलियन संघाला भोगावे लागलेच, पण त्याच्या कसोटी क्रमवारीवर देखील याचा परिणाम पडला. स्मिथ ताज्या कसोटी क्रमवारीत 855 गुणांसह चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. त्याला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे.
त्याव्यतिरिक्त मार्नस लॅबुशेन (Marnus labhuchagne) याचेही नुकसान झाले. लॅबुशेन 849 गुणांसह तो पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. याआधी तो तिसऱ्या क्रमांकावर होता. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. मागच्या वेळी तो पहिल्या पाचमधून बाहेर पडला होता. सध्या बाबरकडे 862 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा 824 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. भारताचा रिषभ पंत (758 गुण) एवळ एकटा आहे, ज्याने पहिल्या 10 फलंदाजांमध्ये स्थान कायम ठेवले आहे. विराट कोहली (700) दोन स्थानांच्या नुकसानासह 14व्या क्रमांकावर आला आहे. तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (729 गुण) 13व्या क्रमांकावर आहे. असे असले तरी, वेस्ट इंडीजविरुद्ध बुधवारी (12 जुलै) सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतून विराट आणि रोहित कसोटी क्रमवारीत सुधारणा करू शकतात. (Travis Head moved up to second spot in the latest ICC rankings, while Steve Smith suffered a loss)
महत्वाच्या बातम्या –
मालिका गमावली, पण तिसऱ्या टी20त श्रीलंकेने घडवला इतिहास; न्यूझीलंडच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड
कर्णधार रोहितला पुणेकर ऋतुराजची फुल गॅरेंटी, तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याने दाखवून दिलंय…’