अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात 88 षटकात 7 बाद 191 धावा केल्या आहेत. तसेच आॅस्ट्रेलिया अजून 59 धावांनी पिछाडीवर आहे. आॅस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने नाबाद अर्धशतक करताना एकाकी झुंज दिली आहे.
या सामन्यात दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीची विकेट गेल्याने भारताचा पहिला डाव 250 धावांवरच संपुष्टात आला.
त्यामुळे लगेचच आॅस्ट्रेलियाचे अॅरॉन फिंच आणि या सामन्यातून पदार्पण करणारा मार्क्यूस हॅरीस हे दोघे सलामीला फलंदाजीसाठी उतरले.
पण पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने फिंचला त्रिफळाचीत करत भारताला पहिले यश लवकर मिळवून दिले. मात्र त्यानंतर हॅरीस आणि उस्मान ख्वाजाने सावध खेळ करत आॅस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
परंतू ही भागीदारी 44 धावांची झालेली असतानाच आर अश्विनच्या गोलंदाजीवर युवा फलंदाज हॅरीस 26 धावांवर बाद झाला. हॅरीसचा झेल सिली पॉइंटला उभ्या असणाऱ्या मुरली विजयने घेतला.
त्यानंतर पहिल्या सत्रात नाबाद असणाऱ्या शॉन मार्शने(2) दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच षटकात विकेट गमावली. त्याला अश्विनने त्रिफळाचीत केले आणि आॅस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. मार्शनंतर फलंदाजीसाठी आलेल्या पिटर हँड्सकॉम्बने ख्वाजाची चांगली साथ दिली होती.
पण डावाच्या 40 व्या षटकात ख्वाजाला 28 धावांवर अश्विनने बाद करत स्वत:ची या सामन्यातील तिसरी विकेट मिळवली. यानंतर तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाल्यानंतर लगेचच पिटर हँड्सकॉम्बनेही 34 धावांवर असताना विकेट गमावली.
त्यानंतर काही वेळातच इशांतने आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला बाद करत आॅस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला. पेन 5 धावा करुन बाद झाला.
त्यानंतर मात्र ट्रेविस हेडने पॅट कमिन्सला साथीला घेत आॅस्ट्रेलियाचा हा डाव सावरला त्यांनी 50 धावांची 7 व्या विकेटसाठी भागीदारी रचली. ही भागीदारी तोडण्यात जसप्रीत बुमराहला यश आले. त्याने कमिन्सला 10 धावांवर असताना पायचीत केले.
आॅस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने एकाकी झुंज देताना 149 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 61 धावा केल्या असून तो दुसऱ्या दिवसाखेर नाबाद आहे. त्याच्या बरोबर मिशेल स्टार्क नाबाद 8 धावांवर खेळत आहे.
भारताकडून दुसऱ्या दिवसाखेर आर अश्विन(3/50), इशांत शर्मा(2/31) आणि जसप्रीत बुमराह(2/34) यांनी विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–चेतेश्वर पुजाराच्या ‘स्टिव्ह’ या टोपन नावामागचे रहस्य शेन वॉर्नने उलगडले
–११ वर्षे आयपीएलशी जोडलेला हा व्यक्ती २०१९च्या आयपीएल लिलावात दिसणार नाही!
–चेतेश्वर पुजाराने या १० गोलंदाजांच्या चेंडूवर मारले आहेत षटकार