येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी दोन्ही ही संघ कसून सराव करत आहेत. या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला इंग्लंड संघाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेत न्यूझीलंड संघातील दिग्गज गोलंदाज ट्रेंट बोल्ट खेळताना दिसून येणार नाही.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेचा फायदा न्यूझीलंड संघाला होऊ शकतो. परंतु या मालिकेत न्यूझीलंड संघासाठी ७१ कसोटी सामने खेळलेला गोलंदाज ट्रेंट बोल्ट खेळताना दिसून येणार नाही. तो थेट विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसून येणार आहे.
न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टिड म्हणाले की, “मला नाही वाटत की, ट्रेंट बोल्ट २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळताना दिसून येईल. तो शुक्रवारी येणार आहे. तसेच तो स्वतःला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तयार करत आहे. त्याने जवळपास एका आठवड्यापासून घरीच गोलंदाजीचा सराव केला आहे. त्यामुळे तो एजबेस्टन कसोटी सामना खेळण्याची खूप कमी शक्यता आहे. ”
ट्रेंट बोल्टची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी
ट्रेंट बोल्टने गेल्या काही वर्षांपासून न्यूझीलंड संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत एकूण ७१ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला २८१ गडी बाद करण्यात यश आले आहे. यात ३० धावा देत ६ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
तसेच वनडे क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण ९३ सामने खेळले आहेत. यात त्याला १६९ गडी बाद करण्यात यश आले आहे. यामध्ये ३४ धावा देत ७ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. यासोबतच त्याने एकूण ३४ टी -२० सामने खेळले आहेत. यात त्याला ४६ गडी बाद करण्यात यश आले आहे.
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या –
‘चिन्ना थाला’ सुरेश रैनाचा लुंगीमध्ये खास अंदाज; सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ
ब्रेकिंग! मुंबई क्रिकेट संघाला मिळाला ‘नवा महागुरु’, ३३ शतके करणाऱ्या दिग्गजाची नियुक्ती
‘तर भारताला कोणीही पराभूत करु शकणार नाही’, अक्षर पटेलने सांगितले कारण