येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र हा हंगाम सुरु होण्याआधीच त्यांचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने या हंगामाला मुकणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामासाठी दिल्लीने २३ वर्षीय रिषभ पंतवर विश्वास दाखवत त्याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.
या हंगामात दिल्ली कॅपिटल्स हा संघ १० एप्रिलला ३ वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी पहिला सामना खेळणार आहे. त्यामुळे रिषभ पंत समोर कर्णधार म्हणून पहिलेच आव्हान हे एमएस धोनी कर्णधार असलेल्या सीएसके संघाचे असणार आहे. याबद्दल रिषभ पंतने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या प्रसिद्धीपत्रकानुसार रिषभ पंतने म्हटले आहे की “माझा कर्णधार म्हणून पहिला सामना माही भाईविरुद्ध (एमएस धोनी विरुद्ध) होणार आहे. मी त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो असल्याने माझ्यासाठी हा एक उत्तम अनुभव असेल. तसेच माझ्याकडे खेळाडू म्हणून स्वत:चा अनुभव देखील आहे. मी माझा अनुभव आणि धोनीकडून शिकलेल्या गोष्टींचा वापर करेल आणि सीएसकेविरुद्ध काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करेल.’
रिषभ आणि धोनी मैदानाबाहेर एकमेकांचे चांगले मित्र असून रिषभकडे भारतीय क्रिकेटमधील धोनीचा वारसदार म्हणून देखील पाहिले जाते.
याबरोबर दिल्लीला पहिले आयपीएल विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न असेल, असेही रिषभने सांगितले. तो म्हणाला, ‘मी या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. आम्ही अजून एकही विजेतेपद जिंकलेले नाही. त्यामुळे यावेळी आम्हाला ते मिळावे यासाठी मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल. मागील दोन-तीन वर्षापासून आम्ही संघ म्हणून चांगले खेळत आहोत. आमची तयारीही चांगली होत आहे.’
रिषभ पुढे म्हणाला, ‘प्रत्येकजण चांगल्या मनस्थितीत दिसत असून सर्वजण १०० टक्के योगदान देत आहे. संघाचे वातावरणही आनंदी आहे. एक कर्णधार म्हणून तुम्हाला हेच हवे असते.’
त्याचबरोबर दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगबद्दल पंत म्हणाला, ‘मागील दोन-तीन वर्षापासून त्याने आमच्याबरोबर चांगले काम केले आहे. तो संघात उर्जा भरतो. एक खेळाडू म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या प्रशिक्षकाकडे पाहाता आणि विचार करता हा असा व्यक्ती आहे, ज्याच्याकडून तुम्ही खुप काही शिकू शकता; यानंतर आणखी काही चांगले असू शकत नाही.’
महत्त्वाच्या बातम्या –
क्यूट व्हिडिओ! आयपीएलच्या तयारीसाठी जॉस बटलरची मदत करतेय त्याची दोन वर्षांची लाडकी लेक
तब्बल सात वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळणार असलेल्या पुजाराची अशी आहे टी२० कारकिर्द; एक शतकही आहे नावावर