इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा सोमवारी (29 मे) संपुष्टात आली. 2021नंतर पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. गुजरात टायटन्स संघाला 5 विकेट्सने पराभूत करत एमएस धोनी याच्या चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचा किताब नावावर केला. या हंगामात चेन्नईच्या यशात युवा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याचा सिंहाचा वाटा राहिला. आपल्या या हंगामातील कामगिरीबद्दल व कर्णधार एमएस धोनीबद्दल त्याने नुकतीच प्रतिक्रिया दिली.
मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या तुषार याची मागील वर्षी चेन्नईने आपल्या संघात निवड केली होती. त्यावेळी त्याला केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळालेली. यावेळी मात्र त्याला पहिल्या सामन्यापासून अंतिम 11 मध्ये स्थान देण्यात आले. तो इतिहासातील पहिला इम्पॅक्ट प्लेयरही ठरला. या हंगामात तो वेळोवेळी बळी मिळवत चेन्नई संघाच्या विजयात योगदान देत होता. आपल्या याच अनुभवाविषयी बोलताना तो म्हणाला,
“हा खरोखरच एक न विसरण्यासारखा अनुभव होता. आयपीएल विजेता होणे ही एक स्वप्नवत गोष्ट आहे. दिल्लीसाठी खेळत असताना माझी ही संधी हुकली होती. मात्र, यावेळी विजेता होण्याचा मान मिळाला आहे.”
त्याने कर्णधार एमएस धोनी याच्याविषयी बोलताना सांगितले,
“पहिल्या सामन्यातच ज्यावेळी मी अधिक धावा देत होतो त्यावेळी तो माझ्याजवळ आला. तो म्हणाला सध्या इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे 200 धावा सहज होणार आहेत. तू तुझ्या संघातील जागेची चिंता करू नको. एका युवा खेळाडूला अशाच पाठिंब्याची अपेक्षा असते. मी संपूर्ण हंगामात केवळ त्याच गोष्टी करत गेलो, ज्या गोष्टी तो मला सांगत होता. तो कठीण काळात खेळाडूच्या मागे एखाद्या सैनिकाप्रमाणे उभा राहतो. मला माहित होते तो की, तो एकही चुकीचा सल्ला देणार नाही.”
तुषार याने या हंगामात चेन्नईसाठी सर्वाधिक 21 बळी मिळवले. 2020 मध्ये तुषार दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. त्यावेळी दिल्लीला मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात पराभूत केलेले.
(Tushar Deshpande Said MS Dhoni Backing Me Lot In CSK)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलपूर्वीच टीम इंडियाला घाबरला स्टीव्ह स्मिथ! म्हणाला, ‘जे भारतात झालं, तेच…’
आयपीएल फायनलनंतर कशी सरली मोहित शर्माची रात्र? जे काही म्हणाला, त्याने तुम्हीही व्हाल भावूक