आयपीएल २०२६ मध्ये सोमवारी (१३ एप्रिल) सनरायझर्स हैद्राबादने राजस्थान रॉयल्सचा हंगामातील विजयी रथ रोकला. यामध्ये हैद्राबादसाठी पदार्पण करणाऱ्या दोन खेळाडूंनी जे केले, त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. त्या दोन वेगवान गोलंदाजांनी राजस्थानला सळो की पळो करुन सोडले. प्रफुल हिंगे याने तर त्याच्या टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर वैभव सूर्यवंशीला बाद केले, त्याला साकिब हुसैन याच्याकडूनही चांगली साथ मिळाली.
प्रफुल आणि साकिब यांनी राजस्थानविरुद्ध प्रत्येकी ४-४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी आयपीएलच्या एका खास यादीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात एका डावात दोन गोलंदाजांनी चार विकेट्स घेण्याचा पराक्रम केवळ चौथ्यांदा घडला. हिंगेने राजस्थानविरुद्ध ३४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तसेच साकिबने २४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.
हिंगे आधीपासूनच हैद्राबादच्या अंतिम अकरामध्ये होता, तर साकिब ट्रेविस हेडच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून दाखल झाला. या दोघांच्या आधी आयपीएलच्या एका डावात दोन गोलंदाजांनी ४ विकेट्स घेण्याची कामगिरी तीनदा झाली आहे. २०१२ मध्ये मुनाफ पटेल आणि किरॉन पोलार्ड यांनी मुंबई इंडियन्सकडून खेळताना राजस्थानविरुद्ध ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर तीन वर्षांनंतर मिचेल स्टार्क आणि श्रीनाथ अरविंद यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अशी कामगिरी केली.
आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा आयपीएलच्या एका डावात दोन गोलंदाजांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. २०२३ मध्ये मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी गुजरात टायटन्सकडून हैद्राबादविरुद्ध अशी कामगिरी केली. आता हिंगे आणि हुसैन जोडीने हा पराक्रम केला आहे. त्यांच्या या प्रभावी गोलंदाजीमुळे हैद्राबादने राजस्थानला दिलेल्या २१७ धावांच्या लक्ष्याचा यशस्वीपणे बचाव केला. हा सामना त्यांनी ५७ धावांनी जिंकला.
आयपीएलच्या एकाच डावात प्रत्येकी ४-४ विकेट्स दोन गोलंदाज-
मुनाफ पटेल आणि किरॉन पोलार्ड (एमआय) विरुद्ध आरआर, मुंबई वानखेडे स्टेडियम, २०१२
मिचेल स्टार्क आणि श्रीनाथ अरविंद (आरसीबी) विरुद्ध पीबीकेएस बंगळुरू, २०१५
मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा (जीटी) विरुद्ध एसआरएच, अहमदाबाद, २०२३
प्रफुल्ल हिंगे आणि साकिब हुसेन (एसआरएच) विरुद्ध आरआर, हैदराबाद, २०२६ (दोघेही पदार्पणाच्या सामन्यात)





