आशिया खंडातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून आशिया चषक ओळखला जातो. आशिया चषकाला 30 ऑगस्टपासून श्रीलंका व पाकिस्तानात सुरुवात होईल. हायब्रीड मॉडेलनुसार होणाऱ्या या स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानात तर इतर सामने श्रीलंकेत होणार आहेत. मात्र, स्पर्धा सुरू होण्यासाठी चार दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच श्रीलंकेतून एक मोठी बातमी समोर येत आहे.
पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानात होणार होते. मात्र, भारताने तसेच त्यानंतर इतर देशांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने चार सामने पाकिस्तानात व उर्वरित सामने श्रीलंकेत खेळण्याचे निश्चित झाले. 30 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच श्रीलंकेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली. श्रीलंकेचे अनुभवी फलंदाज अविष्का फर्नांडो व कुसल परेरा हे दोघे कोरोना बाधित असल्याचे समोर आले असून, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
या दोन्ही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असली तरी, चिंतेची कोणतीही बाब नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्पर्धा ही नियोजित वेळेतच पूर्ण होईल. सध्या कोरोनाची तीव्रता संपली असून, खेळाडू कोरोना संक्रमित असताना देखील खेळताना दिसतात.
आशिया चषकात यावेळी यजमान पाकिस्तानसह श्रीलंका, भारत, बांगलादेश, अफगाणिस्तान व नेपाळ हे संघ सहभागी होतील. भारत पाकिस्तान व नेपाळ हे अ गटात तर उर्वरित तीन संघ ब गटात आहेत. साखळी फेरीनंतर सुपर फोर व त्यानंतर अंतिम सामना खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित सामना 2 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. भारतीय संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे. भारताने 2018 मध्ये ही स्पर्धा आपल्या नावे केली होती.
(Two Srilanka Players Covid Affect Before Asia Cup)
हेही वाचा-
धोनी आणि युवराजच्या निवृत्तीनंतर ‘या’ खेळाडूने घेतली त्यांची जागा, World Cupपूर्वी अश्विनचा मोठा दावा
अफगाणी गोलंदाजाने शादाबला धाडलं तंबूत, ‘मंकडिंग’चा असा व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल!