आगामी जुलै महिन्यामध्ये भारतीय संघ एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौर्यावर जाणार आहे. तसेच त्याचवेळी भारताचा 20 सदस्यांचा कसोटी संघ इंग्लंडमध्येही असेल. इंग्लंडमध्ये भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. तसेच त्यापूर्वी जूनमध्ये इंग्लंडमध्ये भारताला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. म्हणजेच, भारताचे दोन संघ एकाच वेळी वेगवेगळ्या मालिकांसाठी वेगवेगळ्या देशांमध्ये असतील.
असे मानले जात आहे की येत्या काळात इतर बरेच देशदेखील हे मॉडेल अवलंबू शकतात. अनेक क्रिकेट पंडितांच्या मते असे करणे काळाची गरज आहे. तसेच हे नियमितपणे करणे शक्य आहे की नाही हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. आपण या लेखात बघणार आहोत असे प्रसंग जेव्हा एकाच देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ दोन वेगवेगळ्या दौऱ्यावर खेळत होते.
भारताचा एक संघ 1998 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळत होता तर दुसरा संघ राष्ट्रकुल स्पर्धेत
भारताने यापूर्वी देखील एकाच वेळी दोन वेगवेगळ्या संघांची निवड केलेली आहे. 1998 मध्ये हा प्रसंग घडलेला आहे. त्यावेळी एक भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध कॅनडामध्ये एकदिवसीय मालिका खेळत होता तर त्याचवेळी अजय जडेजाच्या नेतृत्वात दुसरा संघ मलेशियामधील राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेत होता. पाकिस्तानने देखील आपले दोन स्वतंत्र संघ स्थापन केले होते.
नव्वद वर्षांपूर्वी इंग्लंडचे दोन संघ एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी खेळत होते सामना
साल 1930मध्ये इंग्लंड संघ एकाचवेळी जगातील 2 वेगवेगळ्या ठिकाणी २ कसोटी सामने खेळत होता. 13 जानेवारी 1930 रोजी एकाच दिवशी इंग्लंडचा एक संघ न्यूझीलंडविरुद्ध ख्राईस्टचर्च येथे तर ब्रिजटाऊन येथे इंग्लंडचा दुसरा संघ वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी सामना खेळत होता.
यावर्षी ऑस्ट्रेलिया देखील दोन संघ बनवणार होता
यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियानेही दोन संघ तयार करण्याची तयारी केली होती. एक संघ न्यूझीलंडबरोबर मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळणार होता. त्याचवेळी, दुसरा संघ कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार होता. मात्र त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत कोरोना साथीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता.
जेम्स सदरलँड यांनी 2010 मध्येच सुचविली होती ही कल्पना
ऑस्ट्रेलियाचे माजी सीईओ जेम्स सदरलँड यांनी 2010 मध्ये एका देशातून दोन स्वतंत्र संघ स्थापन करण्याची सूचना केली होती. ते म्हणाले होते की, जगभरात क्रिकेट लीग होत असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी कमी वेळ उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत सर्व दौरे पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र संघ तयार केले पाहिजेत. ते म्हणाले होते की यामुळे खेळाडूंना क्रिकेटच्या कोणत्याही एका प्रकारात विशेषज्ञ बनण्याची सुविधा मिळेल.
सर्व देश दोन संघ बनविण्यास सक्षम नाहीतः रमीज राजा
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) माजी सीईओ रमीज राजा मात्र या मताशी फारसे सहमत दिसत नाहीत. रमीझ म्हणाले की, सध्या काही देशांमध्ये एकावेळी दोन संघ तयार करण्यासाठी पुरेसे खेळाडू आहेत. मात्र बरेच देश हे करू शकत नाहीत. न्यूझीलंडची लोकसंख्या 6 दशलक्षाहूनही कमी आहे. सलग दोन संघ बनविणे त्यांना शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे इतर अनेक छोटे देशही अडचणीत येऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
दिग्गज क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यात ‘हे’ ५ भारतीय खेळाडू करु शकतात पदार्पण
अरर! सीएसकेचा फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह, वाचा सविस्तर