मंगळवारी(६ ऑक्टोबर) आयपीएल २०२०मध्ये २० वा सामना अबू धाबी येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यातून राजस्थानकडून वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने पदार्पणातच सर्वांना प्रभावित केले आहे. त्याच्या गोलंदाजी शैलीबद्दल राजस्थानचा अष्टपैलू बेन स्टोक्सने खास ट्विट केले आहे.
स्टोक्सने त्याच्याबद्दल ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘त्यागीचा रनअप (चेंडू टाकण्याआधी धावण्याची शैली) ब्रेट ली सारखा आहे आणि चेंडू टाकण्याची शैली इशांत शर्मासारखी आहे.’
Tyagi has a run up like Brett Lee and delivers like Ishant Sharma @rajasthanroyals
— Ben Stokes (@benstokes38) October 6, 2020
त्यागीने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना ३६ धावा दिल्या आणि मुंबईचा सलामीवीर क्विंटॉन डी कॉकची विकेट घेतली.
त्यागीला आयपीएल २०२० साठी कोलकाता येथे झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचायझींनी १.३० कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याने १९ वर्षांखालील विश्वचषकात चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
स्टोक्स आहे क्वारंटाईनमध्ये –
स्टोक्स सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. तो ४ ऑक्टोबरला युएईमध्ये पोहचला असून त्याला कोव्हिड-१९ प्रोटोकॉलनुसार तो ६ दिवस क्वारंटाईनमध्ये राहणे बंधनकारक आहे. तो मागील काही दिवस कॅन्सरग्रस्त वडीलांची काळजी घेण्यासाठी न्यूझीलंडमध्ये होता. त्यामुळे तो आयपीएल २०२० चे सुरुवातीचे काही सामने खेळला नाही.