सध्या संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात इंग्लंड क्रिकेट संघ सर्वोत्तम कामगिरी करताना दिसत आहे. अ गटामध्ये समाविष्ट असलेल्या इंग्लंडने आपले पहिले चारही सामने जिंकत उपांत्य फेरीतील जागा जवळपास पक्की केली आहे. मात्र, उर्वरित दोन सामने व बाद फेरीच्या सामन्यांआधी इंग्लंडला मोठा धक्का बसला असून, संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज टायमल मिल्स दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात झाली दुखापत
सोमवारी (१ नोव्हेंबर) श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात १.३ षटके गोलंदाजी केल्यानंतर मिल्स दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला होता. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याच्या उजव्या मांडीमध्ये दुखापत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता मिल्स पुढील सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. मिल्सने चार सामन्यात १५.४२ च्या सरासरीने चार बळी मिळवले होते. इंग्लंड संघाने त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज रिसे टोप्ली याला संघात समाविष्ट केले आहे.
विश्वचषकातून बाहेर होणारा चौथा खेळाडू
टायमल मिल्स विश्वचषकातून बाहेर होणारा इंग्लंडचा चौथा खेळाडू ठरला. अनुभवी अष्टपैलू बेन स्टोक्स व प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांनी आपण दुखापतीमुळे संघनिवडीसाठी उपलब्ध नसल्याचे कळवले होते. त्यानंतर संघनिवड झाल्यावर अष्टपैलू सॅम करन हा दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. त्याच्या जागी त्याचा भाऊ टॉम करनला संघात स्थान देण्यात आले आहे.
इंग्लंडचे सलग चार विजय
विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून या स्पर्धेत उतरलेल्या इंग्लंडने आतापर्यंत चार सामने खेळताना चार विजय मिळवले आहेत. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीज, दुसऱ्या सामन्यात बांगलादेश, तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया व चौथ्या सामन्यात श्रीलंकेला त्यांनी पराभूत केले. त्यांचा अखेरचा साखळी सामना ६ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
स्कॉटलंडविरुद्ध ९३ धावांची खेळी करताच मार्टिन गप्टीलने केली ‘हिटमॅन’ रोहितची बरोबरी
नवा ‘सिक्सर किंग’! ९३ धावांच्या खेळीसह गप्टिल बनला टी२० चा ‘बॉस’





