---Advertisement---

कोरोनासारख्या संकटांवर मात करत यश धूलच्या भारतीय संघाने जिंकला विश्वचषक, वाचा संघाचा संपूर्ण प्रवास

On: रविवार, फेब्रुवारी 6, 2022 7:37 PM
U19-Team=India
---Advertisement---

भारतीय क्रिकेट विश्वात सध्या सर्वात जास्त चर्चा १९ वर्षांखालील विश्वचषकाची होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. भारताच्या युवा संघाने २०२२ सालचा १९ वर्षांखालील विश्वचषक (U19 World Cup) आपल्या नावे केला आहे. यश धूलच्या नेतृत्त्वाखाली खेळताना भारताच्या युवा संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडला मात दिली आणि विक्रमी पाचव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषकावर नाव कोरले. महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत अनेक संकटांचा सामना केल्यानंतरही भारतीय संघ अपराजित राहिला.

वेस्ट इंडिजमध्ये १६ संघांत झालेल्या या विश्वचषक स्पर्धेत भारताला गट साखळीपासून अंतिम सामन्यापर्यंत ६ सामने खेळावे लागले. या सर्व ६ सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाच्या डोक्यावर विजेतेपदाचा ताजही सजला. या विश्वविजेतेपद मिळवण्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास नक्की राहिला कसा? कोणत्या संघांना भारताने मात दिली? हे आपण या लेखातून पाहू.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, साखळी फेरी
भारत या विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका, युगांडा आणि आयर्लंड सह ब गटात होता. या विश्वचषकापूर्वी १९ वर्षांखालील एशिया कप जिंकून आत्मविश्वास वाढलेल्या भारताचा पहिलाच सामना बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारताने ४५ धावांनी विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. या विजयात मोलाचा वाटा उचलला तो विकी ओत्सवाल, राज बावा आणि कर्णधार यश धूलने.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना धूलच्या ८२ धावांच्या जोरावर २३२ धावा केल्या होत्या. त्यानंतर ओत्सवालने आणि राज बावाने दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी खिळखिळी केली. ओत्सवालने ५ आणि बावाने ४ अशा दोघांनी मिळून ९ विकेट्स घेतल्या आणि दक्षिण आफ्रिकेला १८७ धावांवर रोखले.

भारतीय संघाला कोरोनाचा फटका
पहिल्या विजयानंतर भारतीय संघाला जोरदार धक्का बसला तो कोरोना व्हायरसचा. भारताचा कर्णधार यश धूल, उपकर्णधार शेख राशिदसह एकूण ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यामुळे या खेळाडूंना आयसोलेशनमध्ये जावे लागले. परिणामी हे खेळाडू साखळी फेरींच्या सामन्यांमधून बाहेर पडले. उर्वरित २ साखळी फेरीचे सामने भारताला प्रभारी कर्णधार निशांत संधूच्या नेतृत्त्वाखाली आणि ६ प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळावे लागले. या मोठ्या धक्क्यानंतरही भारतीय संघाच्या कामगिरीवर मात्र मोठा परिणाम झाला नाही.

भारत विरुद्ध आयर्लंड, साखळी फेरी
भारताचा दुसरा सामना झाला तो आयर्लंडविरुद्ध. या सामन्यात भारताने १७४ धावांनी विजय मिळवला. हरनूर सिंग आणि अंगक्रिश रंघूवंशी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ३०७ धावांचा डोंगर उभा केला होता. हरनूरने ८८ आणि अंगक्रिशने ७९ धावांची खेळी केली. यानंतर आयर्लंडचा संघ अवघ्या १३३ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. भारताकडून गोलंदाजीत गर्व सांगवान, कौशल तांबे आणि अनिश्वर गौतम यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या.

भारत विरुद्ध युगांडा, साखळी फेरी
तिसरा सामना युगांडाविरुद्ध असल्याने तुलनेने सोपा होता. या सामन्यात भारताने अनेक विक्रमांसह तब्बल ३२६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात राज बावाने नाबाद १६२ आणि अंगक्रिश रंघूवंशीने १४४ धावा केल्या. त्यामुळे भारताच्या धावफलकावर ५० षटकांनंतर ४०५ धावा लागल्या. यानंतर केवळ ७९ धावांवर युगांडा संघ सर्वबाद झाला. भारताकडून प्रभारी कर्णधार निशांत संधूने ४ विकेट्स घेतल्या. या सामन्यातील विजयासह भारताने उपांत्यपूर्व फेरी गाठली.

भारत विरुद्ध बांगलादेश, उपांत्यपूर्व सामना
उपांत्यपूर्व फेरीमध्ये भारताची गाठ पडली ती गतविजेत्या बांगलादेशविरुद्ध. या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष होते. कारण २०२० साली झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताला पराभूत करत विजेतेपद जिंकले होते.

त्याचबरोबर भारतासाठी या सामन्यापूर्वी आनंदाची बातमी आली ती म्हणजे साखळी फेरीदरम्यान कोरोनाग्रस्त झालेले यश धूल आणि शेख राशिदसह ६ खेळाडू कोरोना निगेटिव्ह झाले होते. त्यामुळे हे खेळाडू बाद फेरीसाठी उपलब्ध होते. मात्र, असं असतानाच यश धूलच्या अनुपस्थित भारताचे नेतृत्त्व केलेल्या निशांत संधूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्याला उपांत्य सामन्यामधून बाहेर व्हावे लागले. या घटना घडत असतानाही भारतीय संघाने स्पर्धेवरील आपले लक्ष विचलीत होऊ दिले नाही.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला भारताने केवळ १११ धावांवर रोखले होते. रवी कुमारने ३ आणि विकी ओत्सवालने २ विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर ३१ व्या षटकातच भारताने ५ विकेट्स गमावत ११७ धावा करून सामना आपल्या नावे केला आणि उपांत्य फेरीमध्ये आपली जागा पक्की केली.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, उपांत्य सामना
उपांत्य सामन्यामध्ये दोन हात करायचे होते ते ऑस्ट्रेलियाशी. पण या सामन्यातही भारताने बाजी मारली आणि दणक्यात आठव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्याचे हिरो ठरले ते कर्णधार यश धूल, शेख राशिद आणि भारताची संपूर्ण गोलंदाजी फळी. भारताने प्रथम फलंदाजी करताना यश धूलच्या ११० धावा आणि राशिदच्या ९४ धावांच्या जोरावर २९० धावा धावफलकावर लावल्या.

यानंतर ऑस्ट्रेलियाचीही सुरुवात चांगली होती. पण भारताच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुंग लावला. यातून ऑस्ट्रेलिया संघ सावरू शकला नाही आणि १९४ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून विकी ओत्सवालने ३, रवी कुमार, निशांत संधू यांनी प्रत्येकी २ आणि कौशल तांबे व अंगक्रिश रंघूवंशीने प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

भारत विरुद्ध इंग्लंड, अंतिम सामना
यानंतर भारताचा अंतिम सामना झाला तो टॉम प्रिस्टच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंड संघाशी. या सामन्यातही भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरीसह इंग्लंडला ४ विकेट्सने पराभवाची धूळ चारली. या सामन्यात इंग्लंडने जेम्स ऱ्यूच्या ९५ धावांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना ४४.५ षटकात सर्वबाद १८९ धावा केल्या होत्या. तसेच भारताला १९० धावांचे आव्हान दिले होते.

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाचीही सुरुवात संघर्षपूर्ण राहिली. मात्र, उपकर्णधार शेख राशिद आणि निशांत संधू यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ४८ व्या षटकात ६ विकेट्स गमावून १९५ धावा करत विजय मिळवला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले. भारताकडून राशिदने ५० आणि निशांतने ५० धावा केल्या. तसेच राज बावाने ३५ धावांची खेळी केली. तसेच ४८ व्या षटकात दोन खणखणीत विजयी षटकारांसह दिनेश बाणाने भारताच्या विजयाला चार चांद लावले.

भारताने हा सामना तर आपल्या नावावर केलाच पण पाचव्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. यापूर्वी भारताने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

गांगुली, अश्विन ते रहाणे, भारताच्या विश्वविजेत्या ‘यंगिस्तान’चं होतंय भरभरून कौतुक, पाहा खास ट्वीट्स

U19 WC: दक्षिण आफ्रिकेचा ‘बेबी एबी’ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी, पाहा आजपर्यंतच्या विजेत्यांची संपूर्ण यादी

‘लेगस्पिन ग्रँडमास्टर’ चहलने घातली नव्या विक्रमाला गवसणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---