---Advertisement---

१९ वर्षांखालील विश्वचषक: टीम इंडियाचे गोलंदाज चमकले; पाकिस्तान संघ झाला ऑलआऊट

On: मंगळवार, फेब्रुवारी 4, 2020 5:22 PM
---Advertisement---

पोचेफस्टरूम। दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात आज(4 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील पाकिस्तान संघात उपांत्य सामना होत आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 172 धावा केल्या आणि भारताला 173 धावांचे आव्हान दिले आहे.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारताच्या गोलंदाजांनी पहिल्या 10 षटकात केवळ 36 धावा देत 2 विकेट्स घेत भारताला चांगली सुरुवात करुन दिली.

भारताकडून सुशांत मिश्राने दुसऱ्याच षटकात मोहम्मद हुरेराला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर 9 व्या षटकात रवी बिश्नोईने फवाद मुनीरला बाद करत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला.

पण त्यानंतर हैदर अली आणि पाकिस्तानचा कर्णधार रोहेल नाझीरने पाकिस्तानचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी रचली. पण अली 77 चेंडूत 9 चौकारांसह 56 धावांची खेळी करुन यशस्वी जयस्वालच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

तो बाद झाल्यानंतर कर्णधार रोहेलने एक बाजू सांभाळताना 62 धावांची खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने नियमित अंतराने विकेट जात होत्या. त्याला मोहम्मद हॅरिसने चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही 21 धावांवर बाद झाला. अखेर रोहेलला सुशांतने 42 व्या षटकात बाद केले. यानंतर केवळ पुढच्या 2 षटकांच्या आत पाकिस्तानचा डाव संपुष्टात आला.

पाकिस्तानकडून अली, रोहेल आणि हॅरिस व्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानला 43.1 षटकात सर्वबाद 172 धावाच करता आल्या.

भारताकडून सुशांतने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या. तसेच अथर्व अंकोलेकर आणि यशस्वी जयस्वालने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

https://twitter.com/Maha_Sports/status/1224632880682291201

https://twitter.com/Maha_Sports/status/1224623110193725440

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---