ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतींचे ग्रहण लागले आहे. यापूर्वीच इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकले आहेत. तर रोहित शर्मा दुखापतीमुळे संघात उशिराने दाखल झाला आहे. याशिवाय पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही दुखापत झाल्याने उर्वरित कसोटी मालिकेतून त्याने माघार घेतली होती.
हे कमी होते की काय म्हणून, आता उमेश यादवची दुखापतही गंभीर असल्याचे समोर आले असून त्यानेही उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे. उमेशचे पोटरीचे स्नायू दुखावल्या गेल्याने त्याने दुसऱ्या सामन्यातच मैदान सोडले होते. चाचण्यानंतर ही दुखापत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उमेश आता उर्वरित सामने खेळणार नसून मायदेशी परतणार आहे.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी जाणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेशच्या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर तो तिसऱ्या आणि चौथ्या सामन्याला मुकणार असल्याचे स्पष्ट झाले होते. अशावेळी त्याला ऑस्ट्रेलियात थांबवून ठेवण्यात फारसा अर्थ नव्हता. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला भारतात पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. उमेश आता बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमासाठी दाखल होईल. फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी दुखापतीतून सावरण्याचा तो प्रयत्न करेल.
टी नटराजनचा होणार समावेश
उमेश यादवच्या जागी तामिळनाडूचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे. नटराजन मर्यादित षटकांच्या मालिकेत संघाचा भाग होता. टी-२० मालिकेत त्याने शानदार प्रदर्शन केले होते. तसेच मर्यादित षटकांच्या मालिका संपल्यानंतर तो सरावासाठीचा गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियातच भारतीय संघाबरोबर थांबला होता. त्यामुळे उपलब्ध पर्यायांमध्ये संघ व्यवस्थापन नटराजनचा संघात समावेश करण्याची विनंती करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
तुझं वजन जरा २० ते २५ किलो जास्तच! वेडचे पंतला मजेदार स्लेजिंग, पाहा व्हिडिओ
‘या’ खेळाडूच्या मते उर्वरित दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघच विजयाचा दावेदार
“ऑस्ट्रेलियन फलंदाजीत ‘ही’ सर्वात मोठी उणीव”, सचिन तेंडुलकर यांनी केले स्पष्ट