इंग्लंड आणि भारत यांच्यात हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस पाहुण्या भारतीय संघाच्या गोलंदाजांना दमवणारा होता. इंग्लंडने कर्णधार जो रूटच्या शतकाच्या जोरावर ८ बाद ४२३ धावा करत ३४५ धावांची आघाडी मिळवली. रूटने १६५ चेंडूत १४ चौकारांसह १२१ धावांची खेळी करत मालिकेतील तिसरे शतक झळकावले. या दरम्यान, भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतशी संबंधित एक घटना घडली.
अशी घडली घटना
दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान पंत आणि कर्णधार विराट कोहली मैदानावरील पंचांशी संवाद साधताना दिसले. तिसरे सत्र सुरू होण्याआधी, पंच ऍलेक्स वार्फ आणि रिचर्ड केटलबरो यांनी पंतला त्याच्या किपिंग ग्लोव्हजवरील टेप काढण्यास सांगितले. टेप त्याच्या करंगळी आणि अनामिके दरम्यान स्पष्टपणे दिसत होती जी एमसीसी नियमानुसार योग्य नाही.
काय आहे नियम
मेरीलबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) किपिंग ग्लोव्हज कायदा २७.२ नुसार, यष्टीरक्षकाने ग्लोव्हज घातले तर, त्याने तर्जनी आणि अंगठ्याचे जंक्शन वगळता इतर बोटांमध्ये कोणत्याही प्रकारची पट्टी असू नये. विशेष म्हणजे, चहापानापूर्वी शेवटच्या चेंडूवर रिषभने डेविड मलानचा झेल टिपल्यानंतर पंचांनी पंतच्या ग्लोव्हजमधून टेप काढून टाकल्या. याचबाबत पंत व विराट दोन्ही पंचांशी चर्चा करत होते. त्यानंतर, समालोचक नासीर हुसेन आणि डेव्हिड लॉयड यांनीदेखील या घटनेविषयी प्रतिक्रिया दिली.
भारतीय संघाला पंतकडून मोठ्या अपेक्षा
भारत लीड्स कसोटी सामन्यात बराच मागे पडलेला दिसत आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाला त्याच्याकडून अपेक्षा असतील. २३ वर्षीय पंत आपल्या कारकिर्दीतील २४ वा कसोटी सामना खेळत आहे. त्याने आतापर्यंत २३ कसोटी सामन्यांमध्ये ३ शतके आणि ६ अर्धशतकांसह १४८७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
चार षटके, तीन धावा अन् तब्बल ७ विकेट्स, टी२० क्रिकेटच्या इतिहासात घडला मोठा विश्वविक्रम
भारतीय संघ अडचणीत, पण मोहम्मद शमीने केलाय ‘मोठा’ विक्रम; कपिल देव, कुंबळेच्या पंक्तीत स्थान
आठ तासांत कसोटीत त्रिशतक करणारे जगातील एकमेव फलंदाज, 46 चौकारांचा दिला गोलंदाजांना प्रसाद