भारतीय क्रिकेटचे व भारतीय गोलंदाजीचे भविष्य म्हणून जम्मू काश्मिरचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याला ओळखले जाते. अवघ्या वर्षभराच्या कालावधीत त्याने आपल्या वेगाने सर्वांना प्रभावित करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पदार्पण केले आहे. आता त्याच उमरानने थेट पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याच्या विक्रमाला आव्हान दिले आहे.
आयपीएल 2021 मध्ये उमरान मलिक याला ओळख मिळाली. त्या हंगामात केवळ दोन सामने खेळताना त्याने सातत्याने 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत सर्वांना अवाक केलेले. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादने त्याला पुढील हंगामासाठी त्याला रिटेन केले. आयपीएल 2022 मध्ये त्याने पुन्हा एकदा तोच वेग दाखवत 22 बळीही आपल्या नावे केले. त्यानंतर त्याला भारतीय संघात देखील स्थान मिळाले. आता तो सातत्याने भारतीय संघात सामील असून, भारताच्या विश्वचषक मोहिमेचा भाग देखील बनला आहे.
श्रीलंकेविरुद्ध सुरू होत असलेल्या टी20 मालिकेपूर्वी एका मुलाखतीत बोलताना त्याने आपल्या गोलंदाजीविषयी महत्वाचे वक्तव्य केले. शोएब अख्तर याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम मोडणार का असे विचारल्यानंतर तो म्हणाला,
“सध्या माझे लक्ष केवळ भारताच्या विजयात योगदान देण्याचे आहे. भारतासाठी अधिकाधिक सामने मला खेळायचे आहेत. वेगवान चेंडूचा विक्रम मोडण्याचे म्हणाल तर, भविष्यात ते होऊ शकते. चालू सामन्यात आम्हाला माहीत नसते की, चेंडू किती वेगाने जात आहे. बाहेर आल्यानंतर या गोष्टींचा उलगडा होतो.”
शोएब अख्तर याने 2002 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 161 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकत विश्वविक्रम बनवलेला. 20 वर्षानंतरही हा विक्रम अबाधित आहे. उमरान हा आयपीएलमध्ये 155 किमी प्रतितास इतक्या सर्वोच्च वेगापर्यंत पोहोचलेला आहे.
(Umran Malik Eyeing Shoaib Akhtar Fastest Ball World Record)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुलदीपचे कौतुक केल्यामुळे दिनेश कार्तिक अडचणीत, प्रशिक्षकांनीच केले आरसा दाखवण्याचे काम
जबरदस्त योगायोग! ‘या’ फलंदाजाने ठोकले 2022 आणि 2023चे पहिले आंतरराष्ट्रीय शतक, केल्या सारख्याच धावा