इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा टप्पा सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये चालू आहे. या टप्प्यातील चौथा आणि हंगामातील ३३ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. बुधवारी (२२ सप्टेंबर) हा सामना सुरू होण्यापूर्वी हैदराबाद संघाचा गोलंदाज टी नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे नटराजनसह त्याच्या जवळून संपर्कात आलेल्या ६ सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. याच धर्तीवर आता हैदराबाद संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णयाने घेतला आहे.
वेगवान गोलंदाज नटराजनचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत तो संघासोबत सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याच्याजागी जम्मू काश्मिरच्या युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याला सामाविष्ट केले आहे.
कोरोना संक्रमित आढळलेल्या नटराजनचा पर्यायी खेळाडू म्हणून जागा मिळालेला उमरान हा नेट गोलंदाजाच्या रुपात हैदराबाद संघासोबत युएईला आला होता. तोदेखील नटराजनप्रमाणे वेगवान गोलंदाजी करण्याची क्षमता राखतो. देशांतर्गत पातळीवर या २१ वर्षीय गोलंदाजाने प्रत्येकी १ लिस्ट ए आणि टी२० सामना खेळला आहे. केवळ २ सामन्यांचा अनुभव असलेल्या उमरानने आतापर्यंत ४ विकेट्स घेतल्या आहेत.
काय आहे कोरोनाग्रस्ताच्या पर्यायी खेळाडूचा नियम?
आयपीएलच्या नियम ६.१ (क)नुसार, कोरोना किंवा इतर कारणास्तव बायो बबलपासून वेगळा झालेल्या खेळाडूच्या जागी अल्पावधीसाठी कोणत्याही पर्यायी खेळाडूला जागा दिली जाऊ शकते. जोपर्यंत प्रमुख खेळाडू बायो बबलमध्ये परतत नाही तोपर्यंत हा पर्यायी खेळाडू संघात त्याची जागा घेईल. त्यामुळे नटराजन कोरोनामुक्त झाल्यानंतर पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत तो हैदराबाद संघाचा भाग असेल.
‘हे’ आहेत नटराजनच्या संपर्कात आलेले ६ सदस्य
नटराजनबरोबर विजय शंकर यालाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. कारण तो नटराजनच्या संपर्कात आला होता. त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असूनही संघ व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. विजयबरोबर नटराजनच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये टीम मॅनेजर विजय कुमार, फिजिओ शाम सुंदर जे, डॉक्टर अंजना वनन, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर आणि नेट बॉलर पेरियासामी गणेशन यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ दिग्गज क्रिकेटपटूमुळे उजव्या हाताचा व्यंकटेश बनला डावखुरा फलंदाज; स्वतः केला खुलासा
भाई भाई! आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय मैदाने गाजवलेल्या भारतीय भावंडांच्या तीन जोड्या
टी२० कारकीर्द वाचवण्यासाठी भारतीय दिग्गजाचा कृणालला ‘गुरुमंत्र’