---Advertisement---

केवळ आजी-माजी क्रिकेटपटूंनीच नाही तर इंग्लंडच्या या फुटबॉलपटूकडूनही टीम इंडियाला मिळाल्या शुभेच्छा

---Advertisement---

ब्रिस्बेन। भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी(१९ जानेवारी) ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ३ विकेट्सने पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला. हा भारताचा ब्रिस्बेनमधील पहिलाच विजय ठरला. तसेच या सामन्याबरोबरच भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी देखील २-१ अशा फरकाने मालिका जिंकत आपल्याकडेच राखली. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारताला या ऐतिहासिक विजयाबद्दल केवळ आजी-माजी क्रिकेटपटूंनीच नाही, तर इंग्लंडचा फुटबॉलपटू हॅरी केन याने देखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्विट केले की ‘भारताचा अविश्वसनीय कसोटी मालिका विजय. प्रत्येक कसोटी सामना पाहाताना मजा आली.’ या ट्विटमध्ये त्याने बीसीसीआयला देखील टॅग केले आहे.

हॅरी केन क्रिकेटचा फॅन – 

खरंतर हॅरी केन हा फुटबॉलपटू जरी असला तरी तो क्रिकेटचा देखील चाहता आहे. तसेच तो भारतीय संघाचा प्रशंसकही आहे. त्याच्यात आणि भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीमध्ये चांगली मैत्री देखील आहे. त्यामुळे त्याने काही महिन्यांपूर्वी स्वत: क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडिओ पोस्ट करत त्याला आरसीबी संघात घेण्याबद्दल मजेने विचारले होते.

ब्रिस्बेन कसोटीत विजय – 

ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाने भारताला ३२८ धावांचे आव्हान विजयासाठी दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून दुसऱ्या डावात शुबमन गिल (९१), रिषभ पंत (८९*) आणि चेतेश्वर पुजारा (५६) यांनी अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. याबरोबरच ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन येथे ३२ वर्षापासून अपराजित राहण्याचा विक्रमही मोडून काढला.

भारताने २-१ ने जिंकली मालिका- 

या कसोटी मालिकेची सुरुवात भारतासाठी खास झाली नव्हती. भारताने ऍडलेड येथे झालेला पहिला सामना ८ विकेट्सने गमावला होता. मात्र यानंतर भारताने यशस्वी पुनरागमन केले आणि मेलबर्न येथे दुसरा कसोटी सामना ८ विकेट्सने जिंकला. यानंतर सिडनी येथे झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे ब्रिस्बेनचा सामना निर्णायक कसोटी सामना ठरणार होता. या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेवर २-१ने कब्जा केला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---