आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या टप्प्यात पूर्णपणे फलंदाजांचं वर्चस्व दिसलं. या हंगामात जवळपास प्रत्येक सामन्यांतच 200 धावांचा टप्पा ओलांडला गेला. मात्र जस-जशी स्पर्धा पुढे जात गेली, तसं-तसं काही वेगवान गोलंदाजांनी आपला दम दाखवायला सुरुवात केली.
आयपीएलच्या या हंगामात काही अनकॅप्ड भारतीय गोलंदाज आहेत, ज्यांनी आपल्या गोलंदाजीनं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 4 गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना पुढे जाऊन भारतीय संघात जागा मिळू शकते.
मयंक यादव – आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत असलेल्या मयंक यादवनं या हंगामात चारच सामने खेळले असले, तरी त्यानं आपली प्रतिभा संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे. मयंकनं त्याचा वेग आणि अचूक लाईन-लेन्थनं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. तो या हंगामात दुखापतीमुळे केवळ चारच सामने खेळू शकला, मात्र यापैकी दोन सामन्यांमध्ये तो ‘मॅन ऑफ द मॅच’ होता. यावरून त्याच्याकडे किती क्षमता आहे, हे लक्षात येतं.
मोहसिन खान – लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा या डावखुरा वेगवान गोलंदाज गेल्या 3 आयपीएल हंगामांपासून शानदार कामगिरी करत आहे. मोहसिन उत्तम वेगासह अचूक टप्प्यावर मारा करतो. यामुळे त्याच्याविरुद्ध फलंदाजांना धावा गोळा करणं जड जातं. या हंगामात मोहसिननं आतापर्यंत 7 सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 9 बळी घेतले आहेत.
हर्षित राणा – कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या हर्षित राणानं आपल्या गोलंदाजीनं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. तो आपल्या वैविध्यपूर्ण चेंडूंनी फलंदाजांना अडचणीत आणतो. त्याचा ‘स्लोअर बॉल’ खेळणं फलंदाजांना खूप अवघड जातं. त्यानं आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या आहेत.
रसिख डार सलाम – दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळणाऱ्या रसिख डार सलाम यांनं आपल्या गोलंदाजीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांमध्ये 7 बळी घेतले आहेत. मात्र महत्त्वाचं म्हणजे, हा वेगवान गोलंदाज अचूक लाईन आणि लेन्थनं गोलंदाजी करतो, ज्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पॅट कमिन्सचा आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण? ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं दिलं अनपेक्षित उत्तर
आयपीएलमध्ये सर्वात जलद 200 षटकार मारणारा भारतीय, संजू सॅमसननं रचला इतिहास!