मंगळवारी (१ फेब्रुवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२२-२३ वर्षासाठी नवा केंद्रीय अर्थसंकल्प (बजेट) सादर केला. यामध्ये इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे क्रीडा क्षेत्रासाठीही अनुदान जाहीर झाले असून अनेक चांगल्या योजनाही आखण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आत्तापर्यंतची सर्वाधिक रक्कम क्रीडा क्षेत्रासाठी जाहीर झाली आहे. यातूनच मोदी सरकारचे क्रीडाप्रेम दिसून आले आहे. क्रीडा क्षेत्रासाठी गतवर्षीपेक्षा यंदा बजेटमध्ये ३०० कोटींहून अधिक वाढ झाल्याचेही दिसून आले आहे.
गेल्या २ वर्षांत सर्वच क्षेत्रांप्रमाणे क्रीडा क्षेत्रालाही मोठा धक्का कोरोना व्हायरसच्या संकटामुळे बसला होता. त्यामुळे गेल्या २ वर्षात क्रीडा बजेटमध्ये कपात केली जात होती. पण, यंदा क्रीडा क्षेत्रासाठी किती बजेट मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. अखेर यंदा मोदी सरकारकडून क्रीडा क्षेत्रासाठी सर्वाधिक ३०६२.६० कोटी रुपयांचे बजेट सादर करण्यात आले.
ऑलिंम्पिकमध्ये २०२१ वर्षात भारतीय खेळाडूंना मिळालेल्या यशाचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. भारताला गेल्यावर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ७ पदके मिळाली होती. या यशाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय खेळाडूंचे कौतुकही केले होते. तसेच ऑलिम्पिक खेळाडूंची भेटही घेतली होती.
क्रीडा बजेटमध्ये वाढ
सितारमन यांनी घोषित केलेल्या अर्थसंकल्पामध्ये २०२२ साठी क्रीडा बजेट ३०६२.६० कोटी रुपये करण्यात आले आहे. गतवर्षीपेक्षा ३०५.५८ कोटींची वाढ क्रीडा बजेटमध्ये झाली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२१-२२ साठी क्रीडा बजेट २७५७.०२ कोटी रुपये होते. तसेच २०२०-२१ साठी भारत सरकारने २८२६.९२ कोटी रुपयांचे बजेट जाहीर करण्यात आले होते. पण कोरोना व्हायरसच्या संकटामुळे हे बजेट कमी करत १८७८ कोटी रुपये करण्यात आले होते.
क्रीडा मंत्रालय क्रीडा बजेट विविध गोष्टींवर खर्च करतात. हा पैसा फिटनेस, ट्रेनिंग, प्रॅक्टिस, स्टेडियम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि प्रशिक्षण अशा गोष्टींवर खर्च होतो.
यंदाच्या अर्थसंकल्पात खेलो इंडिया या क्रीडा स्पर्धेचे बजेटही वाढवण्यात आले आहे. गेल्यावर्षी ८७९ कोटी रुपयांचे बजेट या स्पर्धेला मिळाले होते, तर यावर्षी ९७४ कोटी रुपये करण्यात आले आहे.
गेल्या १० वर्षातील बजेट
गेल्या १० वर्षांतील क्रीडा बजेटचा विचार करायचा झाल्यास यात बरीच वाढ झालेली दिसत आहे. काँग्रेस सरकार असताना २०१२-१३ साली ११५१ कोटी रुपये क्रीडा बजेट जाहीर करण्यात आले होते. तर आता १० वर्षांनी ३०६२.६० कोटी रुपये क्रीडा बजेट जाहीर झाले आहे आहे. त्यामुळे जवळपास १० वर्षात क्रीडा बजेटमध्ये जवळपास २००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
गेल्या १० वर्षांतील क्रीडा बजेट
२०१२-२०१३ – ११५२ कोटी
२०१३-२०१४ – १२१९ कोटी
२०१४-२०१५ – १७६९ कोटी
२०१७-२०१८ – १९४३ कोटी
२०१८-२०१९ – २१९७ कोटी
२०१९ – २०२० – २७७६ कोटी
२०२०-२०२१ – २८२६ कोटी (१८७८ कोटी)
२०२१-२०२२ – २७५७ कोटी
२०२२-२३ – ३०६२.६० कोटी
महत्त्वाच्या बातम्या –
दुसऱ्या ‘कपिल देव’च्या शोधावर गौतम गंभीरकडून नाराजी व्यक्त, नव्या अष्टपैलूविषयी केले मोठे भाष्य
अखेर भारतातील सर्वोच्च देशांतर्गत स्पर्धेचा लागला मुहूर्त! रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर