पुणे: कुंदन स्पेसेस पीसीएमए युनायटेड आणि सीएमडीए वॉर्डविझ या संघांत पुणे व्यापारी महासंघातर्फे आयोजित फेडरेशन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष असून, मुख्य प्रायोजक सिस्का आणि सहप्रायोजक शॉ टोयोटा, गार्नेट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे आहेत.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. रविवारी झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत रक्षित लोढाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर युनायटेड संघाने पीएसए इलेव्हन संघावर ११ धावांनी मात केली. युनायटेड संघाने रक्षित लोढाच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित १२ षटकांत ४ बाद १२७ धावा केल्या. रक्षितने ३३ चेंडूंत ५ षटकार व ३ चौकारांसह ६५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पीएसए संघाला ८ बाद ११६ धावाच करता आल्या. हितेश मिरजकरने तीन, तर रक्षित आणि मनोज मेहताने दोन गडी बाद केले.
दुस-या उपांत्य लढतीत सीएमडीए वॉर्डविझ संघाने लाइफसेव्हर्स संघावर ५२ धावांनी मात केली. वॉर्डविझ संघाने प्रथम फलंदाजी करताना १२ षटकांत ४ बाद १३४ धावा केल्या. यात प्रफुल्ल मानकरने ३२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना लाइफसेव्हर्स संघाला ८ बाद ८२ धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक – १) कुंदन स्पेसेस पीसीएमए युनायटेड – १२ षटकांत ४ बाद १२७ (रक्षित लोढा ६५, आधिश शहा २८, धीरेश सोलंकी १-२३, अभय जैन १-२६) वि. वि. पीएसए इलेव्हन – १२ षटकांत ८ बाद ११६ (अभय जैन ३८, धीरज गुंदेशा २८, हितेश मिरजकर ३-१६, रक्षित लोढा २-२१, मनोज मेहता २-३०).
२) सीएमडीए वॉर्डविझ – १२ षटकांत ४ बाद १३४ (प्रफुल्ल मानकर ६१, संतोष भेलके २८, केतन पासलकर २७, कमलेश मुथा २-३५) वि. वि. सीएपीडी लाइफसेव्हर्स – १२ षटकांत ८ बाद ८२ (अमोल काटके २१, गणेश साळुंके ११, स्वप्नील कटुळे नाबाद ११, प्रफुल्ल मानकर २-१७, गोपाळ बहिरट २-६)