भारतीय संघाला २०१२ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार उन्मुक्त चंदच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले आहेत. त्याने आता भारतीय संघाला रामराम करत अमेरिकेसाठी खेळण्याचे ठरवले आहे. तो आता अमेरिकेत वरिष्ठ संघातून क्रिकेट खेळत आहे. याआधीच त्याने मायनर क्रिकेट लीगमध्ये (एमएलसी) खेळायला सुरुवात केली आहे. उन्मुक्त चंदने आयएनएसशी बोलताना त्याची भारतातील कारकीर्द आणि भविष्याबद्दल माहिती दिली आहे.
भारतातील क्रिकेट खेळण्याच्या अनुभवाबाबत बोलताना उन्मुक्त म्हणाला, “भारतात माझा प्रवास चांगला होता. रॅंकिंगच्या माध्यमातून खेळणे आणि १५ वर्षांखालील, १७ वर्षांखालील, १९ वर्षांखालील क्रिकेटपासून ते रणजी ट्राॅफी, आयपीएल, इंडिया ए, १९ वर्षांखालील विश्वचषक यात खेळणे हा अप्रतिम प्रवास आहे. मी क्रिकेटच्या या प्रक्रियेवर प्रेम करायचो. जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा कधी विचार केला नव्हता की हे अशाप्रकारे पुढे जाईल. मी खूप नशीबवान आहे की, मी हे क्षणही जगलो.”
“हे आयुष्य जगण्यासाठी मी नशीबवान आहे, ज्याच्याविषयी मी स्वप्नातही विचार केला नव्हता. भारतात एवढा वेळ घालवल्यानंतर मी खुश आहे, जिथे मी तीन महिन्यांपूर्वी होतो. मला क्रिकेट खेळण्याशिवाय काहीच माहित नाही. मी भारतीय क्रिकेटमध्ये एक छोटीशी छाप सोडली आहे. मी आता अमेरिकेतील गोष्टींकडे पाहत आहे,” असेही पुढे बोलताना तो म्हणाला.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याविषयी प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, “देशासाठी खेळणे कोणासाठीही एक स्वप्नच असते. कोणत्याही १९ वर्षांखालील क्रिकेटपटूला देशासाठी खेळायचेच असते. पण हे माझ्यासाठी खूप अवघड ठरले. खूप क्रमपरिवर्तन आणि संयोजनाही चालू होत्या. तुम्हाला माहित आहे, खूप गोष्टी घडत होत्या. क्रिकेटमध्ये नशीबाची खूप मोठी भूमिका आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. तुम्ही देशासाठी खेळण्याची अपेक्षा ठेवता, त्याच्यासाठी काम करता, पण नशिबात जे असते तेच घडते. क्रिकेटने मला तो व्यक्ती बनवले आहे, जो मी आज आहे. हे शक्य झाले नसते, जर प्रवास कोणता दुसरा असता. मला माझ्या कारकिर्दीबद्दल कसलाही खेद नाही.”
उन्मुक्त चंद पुढे बोलताना म्हणाला, “मला त्याच गोष्टींमधून पुन्हा जायचे नाहीये. ती माझ्यासाठी मानसिक यातना होती की, मी स्वत: बाहेर बसलेलो आणि XYZ खेळाडूला खेळताना पाहत होतो. तेही अशा खेळाडूला, ज्याला मी माझ्या क्लब संघातही सामील केले नसते. ती गोष्ट पाहून मन निराश व्हायचे. त्याला काहीच अर्थ नव्हता आणि मला हा विचार करून आणखी वेळ वाया घालवायचा नव्हता की, मी खेळणार की नाही? त्यामुळे जेव्हा या गोष्टी घडू लागतात, तेव्हा तुम्हाला त्यात जायला आवडत नाही. माझ्याकडे मर्यादित वेळ आहे आणि मला चांगले क्रिकेट खेळायचे आहे.”
उत्मुक्त चंदने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ६७ प्रथम श्रेणी सामने, १२० अ दर्जाचे सामने आणि ७७ टी२० सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३१.५७ च्या सरासरीने ३३७९ धावा कुटल्या आहेत. त्याचबरोबर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ४१.३३ च्या सरासरीने ४५०५ धावा केल्या; तर टी२० क्रिकेटमध्ये खेळताना त्याने २२.३५ च्या सरासरीने १५६५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अन् विंडीजने ड्रेसिंग रूममध्येच मांडला क्रिकेटचा डाव, होल्डर बनला अंपायर; व्हिडिओ पाहून होईल मनोरंजन
‘…म्हणून आताचे गोलंदाज १५०-१६० च्या वेगाने गोलंदाजी करू शकत नाहीत,’ स्पीड मास्टरने सांगितले कारण
आरारारा खतरनाक! चेन्नई सुपर किंग्जची सुपर डुपर बस दुबईत सज्ज, आता प्रतिक्षा फक्त…