2012 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले होते. या विजयानंतर उन्मुक्त चर्चेत आला होता. त्यावेळी तो लवकरच वरिष्ठ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करेल असे अनेकांना वाटले होते.
परंतू 7 वर्षांनंतरही उन्मुक्तला अजून वरिष्ठ संघात संधी मिळालेली नाही. त्याच्याबरोबर 19 वर्षांखालील संघात खेळलेल्या हनुमा विहारी, संदीप शर्मा यांना भारताच्या वरिष्ठ संघात संधी मिळाली. पण उन्मुक्त मात्र अजूनही यासाठी वाट पहावी लागत आहे.
उन्मुक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळत होता. परंतू काही दिवसांपूर्वीच त्याने दिल्ली संघाची साथ सोडत असल्याचे सांगितले. आता तो यावर्षी उत्तराखंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे. तसेच तो उत्तराखंडचे नेतृत्वही करणार आहे.
असे असले तरी अजून उन्मुक्तने वरिष्ठ भारतीय संघाकडून खेळण्याची आशा सोडलेली नाही. याबद्दल तो टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला, ’19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून आता 7 वर्षे झाली आहेत. त्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. तो माझ्यासाठी खास क्षण होता.’
‘मी सुदैवी आहे की मला विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्याची आणि संघाला विजेतेपद जिंकून देण्याची संधी मिळाली. तो क्षण कायम माझ्या हृदयात असेल. ती भावना शानदार होती.’
‘पण आता त्यातून पुढे जावे लागणार आहे. मला चांगली कामगिरी करायची आहे आणि माझ्या देशासाठी खेळायचे आहे. मी आत्ताशी 26 वर्षांचा आहे. मला खात्री आहे की मी वरिष्ठ भारतीय संघात खेळेल. ते माझे अंतिम स्वप्न आहे. काहीवेळेस हे सर्व लवकर होते तर काहीवेळेस वेळ लागतो.’
2008 ला विराटच्या तर 2018 ला पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 19 वर्षांखालील विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले होते. हे विजेतेपद मिळवल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचा भारताच्या वरिष्ठ संघात समावेश झाला होता. याप्रमाणे उन्मुक्तला मात्र 2012ला 19 वर्षांखालील विश्वचषक विजेतेपद मिळवल्यानंतर भारताच्या वरिष्ठ संघात संधी मिळाली नाही.
पण उन्मुक्तने त्याची तुलना विराट किंवा शॉबरोबर करु नका असे म्हणताना त्यांच्यापेक्षा त्याचा प्रवास वेगळा असल्याचे म्हटले आहे.
उन्मुक्त म्हणाला, ‘माझ्या प्रवासाची तुलना अन्य कोणाहीबरोबर करु नका. ज्या प्रमाणे विराटला आणि पृथ्वीला संधी मिळाली त्याप्रमाणे काही खेळाडूंना ही संधी लवकर मिळते. माझा प्रवास वेगळा आहे.’
‘मला माझा प्रवास जगायचा आहे. मला माझा मार्ग तयार करुन माझे नाव मिळवायचे आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे हेच माझे स्वप्न आहे. मी यासाठी मेहनत घेत आहे. मला खात्री आहे मी हे स्वप्न लवकरच पूर्ण करेल.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–हा दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, टीम इंडियामधील ‘हा’ खेळाडू सर्वात महत्त्वाचा
–२०२० आयपीएलमध्ये आर अश्विन खेळणार ‘या’ संघाकडून
–दुसऱ्या कसोटीतील ‘सामनावीर’ हनुमा विहारीला रवी शास्त्रींनी दिला होता हा सल्ला