ऑस्ट्रेलिया अ संघानं दुसऱ्या अनधिकृत कसोट सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत अ संघावर 6 गडी राखून विजय मिळवला. यासह यजमानांनी टीम इंडियाचा 2-0 असा व्हाईटवॉश केला. भारताला पहिल्या कसोटीत 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या कसोटीत भारत अ संघानं कांगारूंसमोर विजयासाठी 168 धावांचं लक्ष्य ठेवले होतं. ही धावसंख्या ऑस्ट्रेलिया अ संघानं केवळ 4 विकेट गमावून गाठली. ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावाचा हिरो सॅम कोन्स्टास होता, ज्यानं 73 धावांची नाबाद खेळी केली.
168 धावसंख्येचा बचाव करताना टीम इंडियानं चांगली सुरुवात केली होती. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णानं डावाच्या पहिल्याच षटकात मार्कस हॅरिस आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना बाद करून भारताला झटपट बळी मिळवून दिले. यानंतर मुकेश कुमारनं ऑस्ट्रेलियन कर्णधार नॅथन मॅकस्विनी आणि तनुष कोटियननं ऑलिव्हर डेव्हिसला बाद करून भारताला आणखी दोन यश मिळवून दिले. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही.
भारताचा दुसरा डाव 229 धावांवर संपला. यष्टीरक्षक ध्रुव जुरेलनं दुसऱ्या डावातही आपली छाप सोडली. त्यानं 68 धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्याशिवाय तनुष कोटियननं 44, नितीश रेड्डीनं 36 आणि प्रसिद्ध कृष्णानं 29 धावा जोडल्या. कोरी रोचिओली हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं सर्वाधिक 4 बळी घेतले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियानं पहिल्या डावात 161 धावा केल्या होत्या. ध्रुव जुरेलनं पहिल्या डावातही अर्धशतक झळकावलं होतं. त्यानं 80 धावांची शानदार खेळी केली होती. या धावसंख्येला उत्तर देताना ऑस्ट्रेलिया अ संघानं पहिल्या डावात 223 धावा केल्या आणि 62 धावांची आघाडी घेतली होती.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया अ – मार्कस हॅरिस, सॅम कोन्स्टास, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, नॅथन मॅकस्विनी (कर्णधार), ब्यू वेबस्टर, ऑलिव्हर डेव्हिस, जिमी पीअरसन (यष्टीरक्षक), मायकेल नेसर, नॅथन मॅकअँड्र्यू, स्कॉट बोलँड, कोरी रोचिओली
भारत अ – अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, तनुष कोटियन, खलील अहमद, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार
हेही वाचा –
टीम इंडियात फूट? गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात एकमत नाही! अहवालात धक्कादायक खुलासा
IND vs SA; शतक झळकावल्यानंतर संजू सॅमसनच्या नावावर झाले 5 मोठे रेकाॅर्ड
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी भारत-पाकिस्तान आमने-सामने! ‘या’ दिवशी होणार लढत