दुबईच्या मैदानावर गुरुवार रोजी (२९ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात हंगामातील ४३ व सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर १४९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बेंगलोरने १७.३ षटकात ३ विकेट्सच्या नुसकानावर त्यांचे लक्ष्य पूर्ण करत ६ विकेट्सने सामना खिशात घातला. या सामन्यानंतर गुणतालिकेत काही बदल झाले आहेत.
या विजयासह विराट कोहलीच्या बेंगलोर संघाच्या खात्यात २ गुण जमा झाले आहेत. परंतु त्यांच्या स्थानामध्ये मात्र ना बढती झाली आहे ना घसरण. बेंगलोरचा संघ आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांपैकी ७ सामने जिंकत १४ गुणांसह तिसऱ्या स्थानी कायम आहे. परंतु १८ व्या षटकातच हा सामना जिंकत त्यांच्या नेट रन रेटमध्ये मात्र बरीच सुधारणा झाली आहे. सध्या त्यांचा नेट रन रेट -०.२०० इतका आहे.
इतकेच नव्हे तर, या विजयासह त्यांचे प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी झगडणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यासोबतचे अंतरही वाढले आहे. सध्या हे संघ बेंगलोरपेक्षा ४ गुणांनी मागे आहेत.
बेंगलोरच्या हातून मिळालेल्या पराभवानंतर राजस्थानच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये त्यांचा हा सातवा पराभव होता. त्यामुळे -०.४६८ नेट रन रेट आणि ८ गुणांसह हा संघ सातव्या क्रमांकावर आहे. जर त्यांना आता प्लेऑफमध्ये पोहोचायचे असल्यास, उरलेले तिनही सामने मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. परंतु संघाचा सध्याचा फॉर्म पाहता हे जवळजवळ अशक्य दिसत आहे.
यामुळे आता पाचव्या क्रमांकावर असलेल्या मुंबईपुढील एक आवाहन कमी झाले आहे. आता त्यांना प्लेऑफमध्ये धडक मारण्यासाठी केवळ कोलकाता संघाला मागे टाकावे लागेल.
असे अंतिम सामन्यात पोहोचतात संघ
हंगामाच्या अंतिम टप्प्यात गुणतालिकेत पहिल्या २ स्थानांवर असलेल्या संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना खेळला जातो. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यात धडक मारतो. तर पराभूत झालेल्या संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी अजून एक संधी मिळते. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांमध्ये इलिमिनेटर सामना होतो. यातील पराभूत झालेला संघ स्पर्धेतून बाहेर पडतो. तर विजयी संघाचा पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघाशी सामना रंगतो, याला दुसरा क्वालिफायर सामना असे म्हटले जाते. हा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतो.
अशी आहे गुणतालिका-
१. चेन्नई सुपर किंग्ज- १० सामने, ८ विजय, २ पराभव, १६ गुण
२. दिल्ली कॅपिटल्स- ११ सामने, ८ विजय, ३ पराभव, १६ गुण
३. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर-११ सामने, ७ विजय, ४ पराभव, १४ गुण
४. कोलकाता नाईट रायडर्स- ११ सामने, ५ विजय, ६ पराभव, १० गुण
५. मुंबई इंडियन्स- ११ सामने, ५ विजय, ६ पराभव, १० गुण
६. पंजाब किंग्ज- ११ सामने, ४ विजय, ७ पराभव, ८ गुण
७. राजस्थान रॉयल्स- ११ सामने, ४ विजय, ७ पराभव, ८ गुण
८. सनरायझर्स हैदराबाद- १० सामने २ विजय, ८ पराभव, ४ गुण
महत्त्वाच्या बातम्या-
हर्षल पटेलमुळे विराट कोहलीला झाली दुखापत, स्वत: सांगितले मुंबईविरुद्ध खेळताना काय घडले होते?
मॉरिसचा खणखणीत शॉट आणि बंदुकीच्या गोळीच्या वेगाने कोहलीने अडवला चेंडू; फलंदाजही म्हणे, काय होतं हे?