भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvAUS) संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याला गुरुवारपासून ( 9 मार्च) सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दबदबा राखला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने झळकावलेले नाबाद शतक ऑस्ट्रेलियन डावाचे वैशिष्ट्य ठरले. त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांकडून भारतातील कसोटी शतकाचा मोठा दुष्काळ संपवला.
या मालिकेत आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम फलंदाज दिसलेल्या ख्वाजाने अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी आपली योग्यता सिद्ध केली. सुरुवातीला अर्धशतकी सलामी दिल्यानंतर इतर फलंदाज बाद होत असताना त्याने कमालीचा संयम दाखवला. सलामीला फलंदाजीला उतरल्यानंतर दिवसातील अखेरच्या षटकात त्याने आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 14 वे तर, भारताविरुद्धचे पहिले शतक ठरले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो 251 चेंडूवर 104 धावा काढून नाबाद आहे. त्याने या खेळी दरम्यान 15 चौकार मारले.
या शतकासह ऑस्ट्रेलियन सलामीवीराकडून भारतात तब्बल 13 वर्षानंतर कसोटी शतक झळकावले गेले. 2010 मध्ये मार्कस नॉर्थ याने अशी कामगिरी केली होती. त्यानंतर कोणत्याच ऑस्ट्रेलियन सलामीवीराला कसोटीत भारताविरुद्ध भारतात शतक ठोकता आले नव्हते. 2015 मध्ये डेव्हिड वॉर्नर याने सिडनी कसोटीत शतक केलेले.
ख्वाजा आतापर्यंत या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. नागपूर कसोटीच्या दोन्ही डावात अपयशी ठरल्यानंतर त्याने जबरदस्त पुनरागमन केले. दिल्ली कसोटी त्याने 81 तर, इंदोर कसोटीत 60 धावांची लाजवाब खेळी केली होती. त्यानंतर आता शतक करत त्याने आपली स्वतःचीच कामगिरी सुधारली. त्याच्या व्यतिरिक्त केवळ पीटर हॅंड्सकॉम्ब हाच ऑस्ट्रेलियाकडून अर्धशतकी मजल मारू शकला आहे. तर, भारताकडूनही केवळ कर्णधार रोहित शर्मा यालाच शतक झळकावण्यात यश आले होते.
(Usman Khwaja Breaks 13 Years Drought Of Australian Opener Hits Test Century In india)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार म्हणून स्मिथ जेव्हाजेव्हा भारतात आला तेव्हा नडलाय, पाहा ही जबरदस्त आकडेवारी
‘टीम इंडियाला भासतेय पंतची उणीव’, केएस भरतच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे नेटकऱ्यांना आठवला रिषभ, Video