आयपीएल २०२६ मध्ये आपल्या दुसऱ्याच हंगामात १५ वर्षीय फलंदाजाने स्फोटक खेळी करत विरोधी संघांना चकित केले आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने चालू हंगामातही गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. त्याच्या या फलंदाजी शैलीचे अनेक दिग्गजही चाहते झाले असून एबी डिविलियर्स हा पण एक त्यातील आहे. त्याने वैभवचे कौतुक करताना त्याच्यासाठी टी२० चा पुढील प्रवास मात्र सोपा नसणार असा इशाराही दिला आहे.
‘वैभवची खरी परिक्षा तेव्हा सुरू होईल जेव्हा तो कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यास मैदानात उतरेल. सध्या तर तो आयपीएलच्या १९ व्या हंगामात जागतिक दर्जाच्या गोलंदाजांना त्रास देत आहे. तो दबावाखाली आक्रमक आणि निर्भयपणे फलंदाजी करत आहे. त्यामुळे त्याला या हंगामातील सर्वात मोठ्या उद्योन्मुख ताऱ्यांपैकी एक मानले जात आहे, मात्र त्याची खरी परिक्षा बाकी आहे’, असे मत डिविलियर्सने व्यक्त केले आहे.
डिविलियर्स ‘फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट’ या पॉडकास्टवर बोलताना म्हणाला, “इतक्या लहान वयात वैभवला अशाप्रकारे खेळताना पाहणे अविश्वसनीय आहे. तो प्रतिभेने परिपूर्ण आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे, पण त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना पाहायचे आहे. गोष्टी किती बदलणार याची त्याला कल्पना नाही.”
“वैभवने केवळ टी२० वर लक्ष केंद्रित केले तर त्याची कारकीर्द दीर्घ आणि यशस्वी होऊ शकते. त्याने जर वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये नशीब आजमावले तर त्याला क्रिकेटच्या एका वेगळ्या पैलूचा सामना करावा लागेल. जर एखाद्या चांगल्या व्यवस्थापकाने त्याला टी२० विशेषज्ञ म्हणून शेवटपर्यंत खेळण्यास राजी केले, तर त्याची कारकीर्द उत्तम होईल यात शंका नाही. मात्र तो वनडे आणि कसोटी क्रिकेटकडे वळाला, तर त्याला मानसिक आणि शारिरीक अशा दोन्ही प्रकारच्या नव्या आव्हानांना सामोरे जावे लागेल,” असेही डिविलियर्सने पुढे म्हटले आहे.
वैभवने आयपीएल २०२६ च्या हंगामात आतापर्यंत ११ सामने खेळले असून त्यामध्ये ४४० धावा केल्या आहेत.




