आयपीएल २०२६ मध्ये विराट कोहलीची बॅट जोरात आहे. तो धावांचा पाऊस पाडत एकापाठोपाठ एक विक्रम रचत आहेत. आयपीएलच्या या १९ व्या हंगामातील ६१ वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सुरू आहे. धरमशालेत खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पुन्हा एकदा विराटने उत्तम फलंदाजी करत १६ धावा करताच ५०० धावांचा टप्पा गाठला आहे. त्याने सलग चौथ्या हंगामात ही कामगिरी केली आहे.
एका आयपीएल हंगामात ५०० धावांच टप्पा गाठण्याची कामगिरी आता विराटने नवव्यांदा केली आहे. हा या स्पर्धेच्या इतिहासातील एक विक्रम ठरला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी डेव्हिड वॉर्नर आणि केएल राहुल असून दोघांनी प्रत्येकी ७-७ हंगामांमध्ये ही कामगिरी केली आहे. तसेच शिखर धवनने पाच वेळा हा पराक्रम केला आहे. यावरून विराटने अनेक दिग्गजांना खूपच मागे टाकले आहे.
विराटने वयाची ३५ वर्षे ओलांडल्यानंतरही त्याचा फॉर्म कायम ठेवला आहे. त्याने आता ३५ वर्षांचा झाल्यानंतर तीनदा आयपीएल हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकर आणि फाफ डु प्लेसिस यांना मागे टाकले आहे. या दोघांनी प्रत्येकी दोन हंगामात ही कामगिरी केली होती. तसेच माहेला जयवर्धने, मायकल हसी, डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी एका हंगामात अशी कामगिरी केली आहे.
आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक वेळा ५००+ धावा –
विराट कोहली – ९*
डेव्हिड वॉर्नर – ७
केएल राहुल – ७
वयाच्या ३५ वर्षांनंतर आयपीएलच्या एका हंगामात ५०० पेक्षा जास्त धावा –
विराट कोहली – ३ वेळा (२०२४, २०२५, २०२६)
सचिन तेंडुलकर – २ वेळा (२०१०, २०११)
फाफ डु प्लेसिस – २ वेळा (२०२१, २०२३)
सामन्याची स्थिती पाहिली तर विराट ३७ चेंडूंत ४ चौकार आणि तीन षटकार मारत ५८ धावा करत बाद झाला. आयपीएलमध्ये ५० पेक्षा सर्वाधिक धावा करण्याची त्याची ही ७६ वी वेळ (२७२ डाव) आहे, जी विक्रमी आहे. त्याच्यानंतर डेव्हिड वॉर्नरचा क्रमांक लागतो. त्याने १८४ आयपीएल डावांमध्ये ६६ वेळा ५० पेक्षा सर्वाधिक धावा केल्या आहेत.
विराटनंतर वेंकटेश अय्यरनेही अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे आरसीबीने २० षटकांत ४ विकेट्स गमावत २२२ धावसंख्या उभारली.




