क्रिकेट वर्तुळात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील आयपीएल 2013 वाद चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. आता भारताचे माजी पंच अनिल चौधरी यांनी विराटच्या आक्रमक व्यक्तिमत्ताबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी आयपीएलमधील गंभीर-कोहली वादाची आठवण करून दिली आहे.
चौधरी यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये विराटच्या जिद्द आणि तीव्रतेचे कौतुक केले आहे. त्यांनी आक्रमकता हा क्रिकेटचा एक आवश्यक भाग आहे, मात्र मर्यादा ओलांडता कामा नये, असेही मत मांडले आहे.
चौधरी यांनी दिल्लीतील ज्युनिअर क्रिकेटच्या दिवसांपासून विराटच्या सामन्यांमध्ये पंचाची जबाबदारी पार पाडल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते विराटला चांगलेच ओळखतात, तो एक भावूक क्रिकेटपटू असून त्याच्या मनात कधीही वाईट हेतू नसतो, असे त्यांनी सांगितले आहे.
जिओहॉटस्टारवर बोलताना चौधरी यांनी म्हटले, “खरं तर, विराट कोहलीच्या बाबतीत मला एक फायदा असा होता की, मी त्याच्या लहानपणापासूनच्या सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे. त्याच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नसतो.
विराट कधीकधी आक्रमक रिऍक्शन देतो, पण जर तुम्ही योग्य असाल, तर तो तुमची प्रशंसाही करतो (थम्प्स अप देतो); षटकांच्या मधल्या काळात तो जवळ येऊन तुमच्या खांद्यावर हात ठेवतो. तो एक उत्साही आणि जिवंत व्यक्तिमत्त्वाचा माणूस आहे. त्याच्यासारखे खेळाडू असायलाच हवेत, नाहीतर खेळ कंटाळवाणा होईल,” असेही चौधरी यांनी पुढे म्हटले आहे.
चौधरी यांनी 2013 घटनेबाबत बोलताना म्हटेल, मला माहित होते की असं काहीतरी घडेल, कारण उत्तरेकडील खेळाडू आक्रमकतेने खेळतात. मी सुद्धा स्थानिक क्रिकेट खेळलो आहे आणि आमचे खेळाडू नेहमीच असे खेळतात. जर ते त्या आक्रमकतेने खेळले नाही, तर त्यांची कामगिरी तितकी चांगली होणार नाही. तुम्ही खेळाडूंवर अधिक निर्बंध लादले तर खेळ कंटाळवाणा होईल, पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा अते आणि ती ओलांडली जाऊ नये.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात 155 धावसंख्येचा पाठलाग करताना विराट 35 धावांवर बाद झाला. तेव्हा त्याने पॅव्हेलियनमध्ये जाण्याआधी गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीकडे गेला आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.
केकेआरचा तेव्हाचा कर्णधार गंभीरनेही समाविष्ट होत प्रकरण अधिक वाढले, मात्र रजत भाटियाने हस्तक्षेप केला आणि त्यांना वेळेतच रोखले. (former umpire Anil Chaudhary recalls Virat Kohli & Gautam Gambhir ipl spat! Says, “There is a limit; that should not crossed…”)






