भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला जाणार आहे, कारण 15 ऑगस्ट रोजी शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली संघ श्रीलंकेविरुद्ध पहिली कसोटी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत जगभरातील केवळ दोन संघांनी 600 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. आता भारत या यादीत सामील होणार आहे. विशेष म्हणजे, हा ऐतिहासिक क्षण भारताच्या स्वातंत्र्यदिनी घडणार आहे. दरम्यान, भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला असून लवकरच सरावाला सुरुवात करेल.
भारतीय संघाने आतापर्यंत 599 कसोटी सामने खेळले आहेत. गॉल येथे श्रीलंकेविरुद्ध होणारा आगामी सामना भारताचा 600 वा कसोटी सामना असेल. भारताने आपला पहिला कसोटी सामना स्वातंत्र्यापूर्वी 1932 मध्ये सी.के. नायडू यांच्या नेतृत्वाखाली खेळला होता. तेव्हापासून भारतीय क्रिकेटने मोठा प्रवास केला असून विविध कर्णधारांच्या नेतृत्वाखाली अनेक नवीन अध्याय लिहिले गेले आहेत. आता गिलच्या नेतृत्वाखाली आणखी एक ऐतिहासिक अध्याय नोंदवला जाणार आहे.
आतापर्यंत केवळ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने 600 हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. सर्वाधिक कसोटी सामने (1097) खेळण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे ही अशी कामगिरी आहे जिची बरोबरी करणे इतर कोणत्याही संघासाठी जवळपास अशक्य मानले जाते. इंग्लंडने आपला पहिला कसोटी सामना 1877 मध्ये खेळला होता. ऑस्ट्रेलियानेही त्याच वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कांगारुंनी आतापर्यंत 882 कसोटी सामने खेळले आहेत.
1932 पासून भारताने 599 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी संघाने 186 सामने जिंकले आहेत आणि 188 सामन्यांत पराभव पत्करला आहे. 224 सामने अनिर्णित (ड्रॉ) राहिले आहेत, तर केवळ एक सामना ‘टाय’ झाला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 15 ऑगस्ट रोजी होणार असून तो ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’चा (WTC) भाग आहे. यामुळे या मालिकेचे महत्त्व आणखी वाढले आहे. भारताच्या 600 व्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतात, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.






