नुकताच भारतीय संघाने जून महिन्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात दोन विशेष गोष्टी होत्या. पहिली हा दौरा भारतीय संघाच्या मुख्य खेळाडूंविना पार पडला आणि दुसरी या दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची देखील संधी मिळाली. त्यामुळे या दौर्याचे एक वेगळेच महत्त्व आहे.
या दौऱ्यात अनेक भारतीय खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली होती; त्यातीलच एक नाव म्हणजे फिरकीपटू वरूण चक्रवर्ती. चक्रवर्ती इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) कडून खेळतो. आयपीएलमधील त्याचे प्रदर्शन पाहूनच त्याला श्रीलंका दौर्यासाठी निवडण्यात आले होते. ज्यामध्ये चक्रवर्तीने चांगले प्रदर्शन केले.
दरम्यान, चक्रवर्तीने केकेआरमधील त्याचा संघ सहकारी असलेल्या दिनेश कार्तिकला श्रीलंकेतील पदार्पणाच्या एक दिवस आधी फोन करून सल्ला घेतल्याचा खुलासा केला.
याबाबत ईएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलताना चक्रवर्ती म्हणाला, “मी सामन्याच्या एक दिवस आधी दिनेश कार्तिकला फोन केला होता. यावेळी मी कार्तिकला गोलंदाजीसाठी काही सल्ला मागितला होता. कारण कार्तिकने या आधी इंग्लंड विरुद्ध श्रीलंका मालिकेत समालोचनाचे काम केले होते. तसेच या बाबतीत कार्तिकने देखील गोलंदाजी करण्याबाबतच्या खूप सार्या गोष्टी सांगितल्या. सोबतच श्रीलंकेच्या खेळाडूंच्या खेळण्यातील अंदाजाबाबत देखील कार्तिकने सांगितले.”
चक्रवर्तीने खेळलेल्या ३ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २ विकेट घेतल्या आहेत. पदार्पणाच्या वेळी जेव्हा त्याला भारतीय संघाची कॅप मिळाली होती, तो क्षण त्याच्यासाठी खूप भावनिक क्षण असल्याचे देखील यावेळी त्याने सांगितले. तसेच तो सामन्याच्या पूर्वी चिंताग्रस्त देखील होता. त्यावेळी त्याला रात्रभर झोप सुद्धा लागली नव्हती, असंही तो म्हणाला.
याबाबत बोलताना चक्रवर्ती म्हणाला, “जेव्हा मला गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रेने भारतीय संघाची कॅप दिली होती. तो क्षण माझ्यासाठी खूप भावनिक होता. एखादे स्वप्न पूर्ण झाल्यासारखाच तो क्षण होता. नक्कीच यामुळे माझी जबाबदारी देखील वाढली होती. त्यामुळे मला त्यावेळी जास्त भावनिक होऊन चालणार नव्हते. मला केवळ माझ्या प्रदर्शनावर लक्ष द्यायचे होते. सुरुवातीला मी थोडा घाबरलेलो होतो, कारण हा माझा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. सामन्यापूर्वी तर, मला झोप सुद्धा लागली नव्हती. मात्र ज्यावेळी मी पदार्पण करून मैदानात उतरलो त्यावेळेस सगळे काही ठीक झाले.”
दरम्यान, भारतीय संघासाठी श्रीलंका दौरा मिश्र स्वरूपाचा राहिला. एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने १-२ ने विजय मिळवत सामना जिंकला होता. तर टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने भारतीय संघाला टी-२० मालिका २-१ ने गमवावी लागली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
–इंग्लंडच्या सलामीवीराला झालंय तरी काय? ‘या’ नको असलेल्या विक्रमात केली जसप्रीत बुमराहची बरोबरी
–तयारी हेडिंग्ले कसोटीची! मालिकेत २-० ने आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ गाळतोय घाम, पाहा फोटो
–रवी शास्त्रींना तिसऱ्या कसोटीपूर्वी बाउन्सर, यॉर्कर आणि बीमरची झाली आठवण; वाचा नक्की काय आहे भानगड