पुणे | ‘भारतीय विद्या भवन’, ‘इन्फोसिस फाऊंडेशन’ च्या वतीने ‘कन्याकुमारी ते लेह-लडाख ‘ यशस्वी सायकल मोहिमेबद्दल प्रा. वासंती जोशी यांचा सत्कार डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी वासंती जोशी यांची मुलाखत व या मोहिमेचे दृक श्राव्य स्वरूपातील अनुभव कथन झाले. हा कार्यक्रम १२ ऑगस्ट २०१८,रविवारी सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता येथे सायंकाळी झाला.
यावेळी प्रा.सुप्रिया अत्रे यांनी वासंती जोशी यांच्याशी संवाद साधला.
‘ भीतीवर मात करा ( काँन्करिंग द फिअर ‘ हा संदेश घेऊन ही मोहिम आखण्यात आली.
वासंती जोशी म्हणाल्या ,” सायकलिंग, एण्ड्युरो स्पर्धा अशा अनुभवातून तयारी झाली.एरवी महिलांना अशा मोहिमात सामावून घेतले जात नाही, ही मोहिम पूर्णपणे महिलांची होती.
या मोहिमेत ‘ गिरीकंद ट्रॅव्हल्स् च्या संचालक शुभदा जोशी, केतकी जोशी, गायत्री फडणीस – परांजपे अन्य व्यवस्थांसाठी सहभागी झाल्या. त्यांनी सायकल दुरुस्तीपासून चारचाकी दुरुस्ती शिकून घेतली.
वासंती जोशी अनुभव सांगताना पुढे म्हणाल्या, ‘
मोहिम ठरवल्यावर मी सायकलिंगचा सराव केला. दीडशे किलोमीटरपर्यंत सायकलिंगचा सराव केला.४, १२० किलोमीटरचा हा प्रवास झाला. २८ मे ला वीर सावरकर जयंतीला कन्याकुमारी येथुन निघून लेहला महर्षी कर्वे संस्थापक असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या स्थापना दिनी ५ जुलैला पोहोचायचे नियोजन होते. ही ३६ दिवसांची मोहीम होती. या प्रवासात क्रॉस बाईक प्रकारातील मेरीडा सायकल वापरली.
उन्हाळा,बर्फ, पाऊस असा सर्व प्रकारच्या हवामानातून आम्ही प्रवास केला. विश्रामगृह, हॉटेल, घरे , तंबू अशा उपलब्ध ठिकाणी राहत गेलो. लेहला जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला, तो संस्मरणीय क्षण ठरला.
उमलिंगला हा पास १९ हजार फुटावर आहे, तेथे लष्कराच्या मदतीने जायला परवानगी मिळाली. हा जगातील सर्वात उंचावरील वाहन मार्ग आहे. तेथे पोचणारी मी पहिली भारतीय महिला सायकलस्वार ठरले .
‘ मनालीनंतर सायकलिंगचा कस लागला. खारदुंगला नंतर ऑक्सिजन विरळ झाल्यावर सायकलिंगमुळेच कमी त्रास झाला. साहसी मोहिमात सर्वांची विश्वासार्ह मदत मिळते
शुभदा जोशी म्हणाल्या, ‘ गाडी चालवण्याची आवड असल्याने या मोहिमेत मी सहभागी झाले. पुणेकरांच्या प्रेमाचा अनुभव आला. खाऊचे इतके डबे आले की डिकीत जागा उरली नाही.
रोजचे अनुभव ब्लॉगवर लिहित गेलो. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. इतक्या प्रवासात पाय दुखतात अशी तक्रार वासंती जोशी यांनी कधी केली नाही. पायात जणू मशीन बसवल्याप्रमाणे वासंती जोशी यांनी सायकल चालवली.एरवी आपण जे जेवतो तेच त्यांनी खाल्ले.एनर्जी बार, प्रोटीन चे डबे वगैरे डाएट मध्ये नव्हते.
कुरुक्षेत्रला एका गावकऱ्याला रस्ता विचारल्यावर ‘ तुम्हारे ड्रायव्हर , मर्द को बताऊंगा ‘ असा हट्ट धरला. तेव्हा ‘ हम ही ड्रायव्हर है, और हम ही मर्द है ‘ असे सांगावे लागले !
भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. सतीश देसाई , विश्वास जोशी, जयंत जोशी आणि पुणेकर मोठया संख्येने उपस्थित होते.