आयपीएल 2026 हंगामाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी घटना घडली. रविवारी (31 मे) अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळला गेला, ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरातचा 5 विकेट्सने पराभव केला. यानंतर गुजरातचा संघ हॉटेलकडे परतत असताना त्याच्या टीम बसमध्ये अचानक धूर पसरला. या घटनेचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
हा धूर शॉर्ट सर्किटमुळे पसरल्याचे कळते, त्यामुळे सपोर्ट स्टाफला बसमधून बाहेर पडून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रस्त्याच्या कडेला थांबावे लागले होते. सुदैवाने संघाचे सर्व सदस्य आणि सहाय्यक कर्मचारी सुखरून होते. या घटनेमुळे गुजरातच्या निराशाजनक स्थितीत आणखी भर पडली, कारण त्याचे दुसरे आयपीएल विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंग झाले होते.
या प्रसंगाचे वर्णन गुजरातचा विकेटकीपर-फलंदाज जोस बटलरने केले आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आला असून बटलर त्यामध्ये घटनेची भयानक स्थिती सांगितली आहे. तो म्हणाला, “नेहमीच एक विजेता आणि एक पराजित संघ असणारच, त्यामुळे कोणाला एकालातरी पराजित व्हावंच लागत, मात्र दुर्दैवाने ते आम्ही होतो. रात्रीचे 2 वाजले असतील आम्ही परतत असताना बसच्या मागच्या बाजूला बसलेल्यांना धुराचा वास येऊ लागला आणि आम्ही सगळे बसमधून उतरून रस्त्याच्या कडेला थांबलो. मला खात्री आहे की तिकडे RCB पार्टी करत असणार आणि आमचे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न खाक होत होते. हे खूप निराशाजनक आहे आणि खरं सांगायच तर यातून सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल.”
गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या गुजरातने बंगळुरूकडून क्वालिफायर १ मध्ये पराभूत झाल्यानंतर जोरदार पुनरागमन केले होते. त्यांनी क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने पराभव करत तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तेथे त्यांना पुन्हा एकदा बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला.
गुजरातसाठी या हंगामाचा शेवट अतिशय निराशाजनक आणि वेदनादायी ठरला.






