रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं रविवारी (17 मार्च) रात्री WPL 2024 चं विजेतेपद जिंकून ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. फ्रँचायजीचा पुरुष संघ गेल्या 16 वर्षांपासून जे करू शकला नाही, ते त्यांच्या महिला संघानं दुसऱ्या सत्रातच करून दाखवलं. अंतिम सामन्यात आरसीबीनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. बंगळुरूच्या या विजयानंतर सोशल मीडियावर अभिनंदनाचा पूर आला आहे. दरम्यान, आरसीबीचे माजी मालक विजय माल्ल्या यांनीही टीमसाठी ट्विट केलं, जे सध्या खूप व्हायरल होत आहे.
WPL 2024 चं विजेतेपद जिंकल्याबद्दल विजय माल्ल्या यांनी आरसीबीचं अभिनंदन केलं. तसेच पुरुष संघानं यंदाच्या आयपीएल 2024 चं विजेतेपद जिंकलं तर हा आनंद द्विगुणित होईल, असंही ते म्हणाले. विजय माल्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिलं, “WPL जिंकल्याबद्दल आरसीबी महिला संघाचं हार्दिक अभिनंदन. आरसीबी पुरूष संघानं बहुप्रतिक्षित आयपीएल जिंकल्यास हा आनंद द्विगुणित होईल. संघाला शुभेच्छा.”
विजय माल्ल्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी म्हटलं की, जर आरसीबीनं आयपीएल 2024 चं विजेतेपद जिंकलं तर तुम्हाला भारतात परतावं लागेल. तर एका यूजरनं लिहिलं की, विजय माल्ल्या त्याच दिवशी पोस्ट करतात ज्या दिवशी बँकची सुट्टी असते.
Heartiest congratulations to the RCB Women’s Team for winning the WPL. It would be a fantastic double if the RCB Men’s Team won the IPL which is long overdue. Good Luck.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) March 17, 2024
बिजनेसमॅन विजय माल्ल्या यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडियासोबत फसवणूक केल्याचा आरोप आहे. ते बँकेचे 9000 कोटी रुपये घेऊन देशातून फरार आहेत. सध्या ते लंडनमध्ये आपलं जीवन व्यतीत करत असल्याचं सांगण्यात येतं.
अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या शेफाली वर्मानं दिल्ली कॅपिटल्स संघाला तुफानी सुरुवात करून दिली. पॉवरप्लेमध्ये संघानं एकही विकेट न गमावता 61 धावा केल्या होत्या. 8व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शेफाली वर्मा (२७ चेंडूत ४४ धावा) मोलिनक्सची बळी ठरली. त्यानंतर डीसी संघ पत्त्याच्या घरासारखा कोसळला. त्याच षटकात आरसीबीनं आणखी दोन विकेट घेत सामन्यात पुनरागमन केलं. आरसीबीच्या या पुनरागमनानंतर दिल्लीचा डाव अडखळला आणि संपूर्ण संघ 18.3 षटकांत केवळ 113 धावांवर ऑलआऊट झाला.
114 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधना (31) आणि सोफी डिव्हाईन (32) यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावा जोडल्या. यानंतर एलिस पेरीनं 35 धावांची नाबाद खेळी आणि रिचा घोषनं 17 धावांची नाबाद खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
भावा! सोशल मीडियावर सगळीकडे आरसीबीचीच हवा! ट्रॉफी उचलतानाच्या फोटोनं रचला नवा इतिहास
WPL 2024 : आरसीबीच्या विजयावर राजस्थान रॉयल्सची चुटकी, शेअर केलं भन्नाट मिम