विनीत राय हा भारतमधील प्रतिभाशाली मध्यरक्षकांच्या नव्या पिढीचा प्रतिनिधी आहे. हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गेल्या दोन मोसमांमध्ये तो दिल्ली डायनॅमोजच्या मध्य फळीचा आधारस्तंभ होता. आता तो ओडिशा एफसीमध्ये दाखल झाला आहे.
विनीत केवळ 21 वर्षांचा आहे, पण त्याने आत्ताच प्रदीर्घ वाटणाऱ्या कारकिर्दीत स्वतःचे नाव निर्माण केले आहे. यानंतरही खऱ्या अर्थाने अजूनही मोठी मजल मारण्याची उत्सुकता त्याने निर्माण केली आहे. तो वयाच्या 15व्या वर्षापासून उच्च पातळीवर खेळतो आहे. त्यामुळे असे घडणे स्वाभाविक आहे.
विनीत म्हणाला की, ‘सुरवातीला मी ज्या क्लबमध्ये होतो तेथे मला खेळण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. दिल्लीचा मात्र मी आभारी आणि ऋणी आहे. येथे एक खेळाडू म्हणून माझी प्रगती झाली आहे. माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवल्याबद्दल मी प्रशिक्षकांचा आभारी आहे. भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याची मला आशा आहे.’
विनीतसाठी 2014-15च्या आय-लीग मोसमात धेंपोमध्ये सुरूवात झाली. तो काही सामने खेळला. आयएसएलमध्ये त्याला पहिली संधी 2016 मध्ये केरला ब्लास्टर्सकडून मिळाली. तेथून तो मिनर्व्हा पंजाब आणि मग दिल्ली डायनॅमोजकडे गेला.
दिल्लीत दाखल झाल्यापासून तो प्रमुख संघाकडून नियमीतपणे खेळला आहे. त्याने मध्य फळीत आपला जम बसविला आहे. तो मध्य फळीसाठी खरोखर योग्यतेचा आहे. लीगमधील पासिंगचा एक मास्टर खेळाडू असा त्याचा लौकीक आहे. सामन्यागणिक 40 हून जास्त पासेस आणि अचुकतेची 82.45 टक्केवारी त्याने राखली आहे. स्टार्टींग लाईन-अपमध्ये नियमित संधी मिळत नसतानाही त्याने राखलेले प्रमाण लक्षवेधी आहे. आतापर्यंत लीगमध्ये तो दोन हजार मिनिटांपेक्षा जास्त काळ खेळला आहे. आता ओडिशामधून एक खेळाडू म्हणून विकासाची प्रक्रिया पुढे सुरू ठेण्याची त्याला आशा आहे.
तो म्हणाला की, ‘मध्यरक्षक स्थित्यंतराची प्रक्रिया वेगाने पूर्ण करतात. हल्ली आम्ही चेंडू ताब्यात असल्यावर आणखी सुकर खेळ दाखवितो. याचे श्रेय आयएसएलला जाते. आयएसएलमुळे चांगली पद्धत निर्माण झाली असून चांगले प्रशिक्षक आणले जातात. अशा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग करायला मिळणे आणि चांगल्या खेळाडूंच्या जोडीला खेळायला मिळणे आमचे भाग्य आहे. त्यामुळे आम्हाला नव्या गोष्टी शिकायला मिळतात, ज्यांचा अवलंब आम्ही आमच्या खेळात करू शकतो. मला सर्व काळ चेंडू ताब्यात असल्यास खुप आवडते. त्यामुळे मी सामन्यात सक्रीय सहभाग नोंदवू शकतो.’
भारतीय संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक इगोर स्टीमॅक मध्य क्षेत्रात चेंडूचा चांगला वापर करू शकणाऱ्या खेळाडूंना पसंती देतात. यात विनीतचा समावेश असल्यामुळे क्रोएशियाच्या या प्रशिक्षकांना प्रभावित करण्याची संधी त्याला मिळाली. भारतीय संघात दाखल झाल्यानंतर स्टीमॅक यांनी पहिल्या पत्रकार परिषदेसाठी विनीतची खास निवड केली होती.
प्रसिद्ध टाटा फुटबॉल ऍकॅडमीत घडलेला विनीत म्हणाला की, ‘पत्रकार परिषदेसाठी निवड झाल्यामुळे मला थोडेसे आश्चर्य वाटले, पण भारतात आगमन झाल्यापासून मला संधी देत असल्याबद्दल मी स्टीमॅक यांचा ऋणी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी वरिष्ठ पातळीवरील पदार्पण केले. माझी उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी मी कसून सराव करतो आहे.’








