कानपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एका व्यक्तीचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. खरंतर ही व्यक्ती स्टेडियममध्ये गुटखा खाताना कोणाशी तरी फोनवर बोलत होती आणि त्यानंतर कॅमेरामनने या व्यक्तीवर कॅमेरा नेला आणि तो त्यानंतर तो व्यक्ती सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्याचवेळी आता या व्यक्तीची ओळख पटली असून त्याने एक मोठे वक्तव्य केले आहे.
शोभित पांडे असे व्हायरल होत असलेल्या व्यक्तीचे नाव असून तो कानपूरचा रहिवासी आहे. शुक्रवारीही (२६ नोव्हेंबर) तो सामना पाहण्यासाठी आला होता आणि यादरम्यान त्याने एक संदेश दिला आहे. यावेळी शोभित पांडे यांनी ‘गुटखा खाणे ही वाईट सवय आहे’ असा फलक आणला होता. त्यानंतर या फलकाचीही जोरदार चर्चा झाली.
शोभित पांडेचा फोटो व्हायरल झाल्यापासून त्याच्यावर अनेक मीम बनवले जाऊ लागले आहेत. माजी क्रिकेटर वसीम जाफरनेही त्याच्यावर एक मीम शेअर केला आहे. मात्र, शोभितने सामन्यादरम्यान गुटखा खाल्ला नसल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, “पहिली गोष्ट मला हे स्पष्ट करायचे आहे की मी गुटखा खात नव्हतो. मी पान खात होतो आणि सामना बघायला आलेल्या माझ्या मित्राशी फोनवर बोलत होतो. पण तो दुसऱ्या स्टँडवर बसला होता. मी फक्त दहा सेकंद बोललो आणि तितक्यात तो फोटो व्हायरल झाला. माझ्या मित्राच्या आईने मला सांगितले की हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि वेगाने पसरत आहे.”
शोभित पांडेने सांगितले की, त्याची बहीणही त्याच्यासोबत सामना पाहण्यासाठी गेली होती आणि तीही या फोटोत दिसत आहे आणि त्यावरही अनेक कमेंट येत आहेत. शोभित पुढे म्हणाला, “मी काहीही चुकीचे केलेले नाही आणि त्यामुळेच मला झालेल्या या प्रकाराची लाज वाटत नाही. मला फक्त एवढीच काळजी वाटते की माझ्या बहिणीबद्दल चुकीच्या कमेंट येत आहेत. त्याचवेळी मला मीडियासह अनेक ठिकाणांहून फोन येत आहेत. या सगळ्यांना मी कंटाळलो आहे.”