अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या चौथ्या कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडला एक डाव आणि २५ धावांनी पराभूत केले. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा दुसरा डाव १३५ धावांमध्ये संपुष्टात आणत भारताचा विजय सुकर केला. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी पात्र होताच विराट कोहलीचा भारतीय कर्णधारांच्या एका विशिष्ट यादीत समावेश झाला.
भारतीय संघाचा मोठा विजय
विराट कोहलीचे नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंडला चौथ्या कसोटी तिसऱ्या दिवशी पाणी पाजत चार सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशा फरकाने विजय नोंदविला. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या २०५ धावांना प्रत्युत्तर देताना रिषभ पंतचे शतक व वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद ९६ धावांच्या बळावर भारताने ३६५ धावा उभारल्या. इंग्लंडचा दुसरा डाव रविचंद्रन आश्विन व अक्षर पटेलने प्रत्येकी पाच बळी मिळवत १३५ धावांवर संपविला. अशाप्रकारे, भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय संपादन केला. रिषभ पंतला सामनावीर तर रवीचंद्रन अश्विनला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
भारतीय कर्णधारांच्या खास यादीत विराट
भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करेल. याचबरोबर विराटने आयसीसीच्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार्या भारताच्या पहिल्या कर्णधारांमध्ये सामील होण्याचा मान मिळवला.
भारतीय संघाने १९८३ मध्ये वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यावेळी, कपिल देव हे भारतीय संघाचे कर्णधार होते. त्यावेळी भारतीय संघाने जगज्जेतेपद पटकावलेले. त्यानंतर, २००० मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला. २००७ मध्ये प्रथमच खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एमएस धोनीने भारताचे नेतृत्व केले व संघाला विश्वविजेते बनवले. त्यानंतर, आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत विराट कर्णधार म्हणून उतरेल.
लॉर्ड्सवर होणार अंतिम सामना
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १ ऑगस्ट २०१९ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली होती. या स्पर्धेचा अंतिम सामना यावर्षी जून महिन्यात १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान लॉर्डस मैदानावर खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केल्यानंतर न्यूझीलंड संघ गुणांच्या सरस टक्केवारी मिळेल आधीच अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मॅन ऑफ द सीरिज’चा मान अश्विनच्या पारड्यात, सचिन-सेहवागलाही सोडलं पिछाडीवर
Video : गावसकरांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची पन्नाशी, बीसीसीआयने ‘असा’ केला सन्मान
भावा हे काय केलंस! विराटचा थ्रो लागला रूटच्या नाजुक भागी, मजेदार व्हिडिओ होतोय व्हायरल