क्रिकेटच्या मैदानात स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणे सर्वात अवघड असते. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. फलंदाजाच्या बॅटीचा कड घेऊन तो झेल स्लिपमध्ये असलेल्या खेळाडूला पकडता आला पाहिजे. कसोटी क्रिकेटमध्ये आपण अनेकदा पाहिले आहे दहावी विकेट काढण्यासाठी कसा आटापीटा केला जातो. भारतीय पुरूष क्रिकेट संघाला अनेक उत्तम क्षेत्ररक्षक लाभले आहेत. तर सध्याच्या घडीला सर्वोत्तम स्लिपमधील फिल्डर म्हणून विराट कोहली याचे नाव पुढे येते.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि क्षेत्ररक्षक विराट कोहली (Virat Kohli) हा मागील काही महिन्यांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. त्याने २०१९मध्ये शेवटचे शतक केले, त्यानंतर आता त्याला १००० दिवस पूर्ण झाली आहेत. असे असले तरी तो संघासाठी योगदान देण्यात नेहमी पुढेच राहिला आहे. त्याने शतक जरी केले नसले तरी त्याने अर्धशतके केली असून त्याची सरासरीही उत्तम आहे. त्याचबरोबर तो क्षेत्ररक्षणातही जबरदस्त ठरला आहे. त्याने अनेक सामन्यात उत्तम क्षेत्ररक्षण करत संघाच्या विजयात मोलाची भुमिका पार पाडली आहे.
भारताने २०११मध्ये जिंकलेल्या विश्वचषकात युवराज सिंग आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांच्यासोबत क्षेत्ररक्षण करणारा विराट १० वर्षानंतर आजही तेवढाच चपळाईने क्षेत्ररक्षण करतो. त्यामागचे रहस्य आता उलगडले आहे.
विराटने कशी शिकली फिल्डींग
भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी एका स्पोर्ट्स वेबसाईटला विराट क्षेत्ररक्षणामध्ये सर्वोत्तम का आहे हे सांगितले आहे. ते म्हणाले, “स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी एकाग्रता आणि धैर्य लागते. विराटकडे हे दोन्ही असून त्याने काळाप्रमाणे शारिरीक ऊर्जेचाही योग्य वापर केला आहे. त्यामुळेच तो स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणारा सर्वोत्कृष्ठ खेळाडू बनला आहे.”
विराटने कर्णधारपद सोडल्यापासून त्याला अनेकवेळा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना पाहिले आहे. त्याने अनेकवेळा सूर मारत झेलही पकडले आहेत.
श्रीधर पुढे म्हणाले, “अभ्यासादरम्यान विराट अनेकवेळा १०० झेल पकडण्याचा सराव करत असतो. जेव्हा आम्ही सराव बंद करण्याचे बोलू तेव्हा तो आम्हाला, तुम्ही थकला आहात का? कारण मला अजून झेल पकडण्याचा सराव करायचा आहे. तसेच जेव्हा त्याला चेंडू संथ गतीने येताना दिसतो तेव्हा तो दोन पावले पुढे जाऊन उभे राहतो, जेणेकरून त्याला कठीण झेल पकडता येईल, त्याच्या त्या कठोर मेहनत, एकाग्रता यामुंळेच तो जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.”
विराटने कसोटीमध्ये १०२, वनडेत १३८ आणि आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ४४ झेल घेतले आहेत.