भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ( बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ) पहिल्या सामन्याला गुरुवारपासून (१७ डिसेंबर) सुरुवात झाली. हा सामना ऍडलेड ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आकर्षक अर्धशतक झळकावत भारताचा डाव सावरला. पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात ६ बाद २३३ धावा बनविल्या आहेत.
विराटने या सामन्यातील अर्धशतकी खेळीदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांत चौथे स्थान मिळवले.
पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. नाणेफेक हरल्यानंतरही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी नेटाने गोलंदाजी करत भारताचे दोन्ही सलामीवीर झटपट तंबूत धाडले. विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांनी ६८ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. संयमी खेळी करणाऱ्या पुजाराला फिरकीपटू नॅथन लायनने बाद केले.
चौथ्या गड्यासाठी कर्णधार विराट कोहली उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी ८८ धावा जोडत भारताच्या धावसंख्येला आकार दिला. मात्र, रहाणेच्या एका चुकीने विराट धावबाद झाला आणि भारतीय डावाला लहानशी गळती लागली. विराटनंतर रहाणे आणि विहारी झटपट बाद झाल्याने भारताची धावगती मंदावली. यष्टीरक्षक वृद्धिमान साहा व रविचंद्रन अश्विन यांनी आणखी पडझड होऊ न देता दिवसाखेर भारताची धावसंख्या ६ बाद २३३ पर्यंत पोहोचवली.
भारताकडून विराटने सर्वाधिक ७४ धावा बनवल्या तर ऑस्ट्रेलियासाठी मिशेल स्टार्कने २ तर पॅट कमिन्स, जोश हेजलवूड व लायन यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
विराट झाला दिग्गजांच्या पंक्तीत सामील
पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ७४ धावांची खेळी केल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली एका विशिष्ट यादीत सामील झाला आहे . ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराटने महान फलंदाज सर विवियन रिचर्ड्स यांना मागे टाकत चौथे स्थान पटकावले. विराटने २००९ पासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजतागायत २० कसोटी, ४३ वनडे व १९ टी२० सामन्यातील ९४ डावात खेळताना ४,४७९ धावा काढल्या आहेत. यात कसोटीतील ७ तर वनडेतील ८ शतकांचा समावेश आहे.
हे दिग्गज आहेत पहिल्या पाचात
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताच्या सचिन तेंडुलकरचा पहिला क्रमांक लागतो. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४४ आंतरराष्ट्रीय डावात ६,७०७ धावा काढल्या आहेत. वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०८ आंतरराष्ट्रीय डाव खेळत ४,७१४ धावा ठोकल्या होत्या.
वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार डेसमंड हेन्स या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. हेन्स यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२३ डावात ४,४९५ धावांची लयलूट केली होती.
विराटने हे अर्धशतक केल्याने वेस्ट इंडीजच्याच सर विवियन रिचर्ड्स यांना पाचव्या स्थानी जावे लागले. रिचर्ड्स यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०४ डावात ४,४५३ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात विराटला या यादीत तिसऱ्या स्थानी जाण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कोणत्याही परिस्थितीत मला तिथे उपस्थित रहायचे आहे’, पालकत्व रजेवर बोलताना विराटचे वक्तव्य
दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला विराट; केली ‘ही’ अचाट कामगिरी
ऑस्ट्रेलियात मैदान गाजवणारा अष्टपैलू हार्दिक पंड्या घालवतोय पत्नीसोबत वेळ; फोटो व्हायरल