आयसीसीने रविवारी (२७ डिसेंबर) दशकातील सर्वोत्तम संघांची आणि सहसदस्य देशांच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्कारांची घोषणा केली. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी, वनडे व टी२० या तिन्ही संघांत जागा मिळवणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटपटू ठरला. यासोबतच विराटकडे दशकातील कसोटी संघाचे कर्णधारपद देखील दिले गेले आहे. विराटने दमदार कामगिरी करत हे संपूर्ण दशक आपल्या नावे केलेले दिसून येते.
आयसीसीने जाहीर केले दशकातील संघ
आयसीसीने रविवारी (२७ डिसेंबर) तिन्ही प्रकारच्या क्रिकेटचे दशकातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय संघ जाहीर केले. आयसीसीच्या निवड समितीने हा संघ निवडण्यासाठी १ जानेवारी २०११ ते ७ ऑक्टोबर २०२० हा कालावधी लक्षात घेतला आहे. याशिवाय या कालावधीत ५ वर्षे खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनाच संघात स्थान दिलेले दिसून येते.
विराटला मिळाले तिन्ही संघात स्थान
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसीने जाहीर केलेल्या तिन्ही प्रकारच्या संघात समावेश असणारा एकमेव खेळाडू आहे. विराटने २०११ ते २०२० या कालावधीत चमकदार कामगिरी करत हा बहुमान पटकावला. विराटने या कालावधीत ८६ कसोटी सामने खेळताना ५३ च्या सरासरीने ७,२३६ धावा काढल्या आहेत. यात २३ शतकांचा समावेश आहे.
कसोटी क्रिकेट सोबतच विराटने १ जानेवारी २०११ ते ७ ऑक्टोबर २०२० दरम्यान २०८ वनडे सामने खेळत ६१.६३ च्या सरासरीने १०,३८८ धावा झोडल्या आहेत. यावेळी विराटने ३९ वनडे शतके झळकावली. विराटने सदर कालावधीत ८० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. या ८० सामन्यात विराटने ५०.३२ च्या सर्वोत्तम सरासरीने २,७६८ धावा जमवल्या आहेत.
कसोटी संघाचे कर्णधारपद विराटकडे
सध्या भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या विराट कोहलीकडे २०११-२०२० या काळातील सर्वोत्कृष्ट कसोटी संघाचे नेतृत्व दिले आहे. विराट २०१४ पासून भारताच्या कसोटी संघचे नेतृत्व करत आहे. भारताचा ३२ वा कसोटी कर्णधार असलेल्या विराटने ७ ऑक्टोबर २०२० पर्यंत ५५ कसोटी सामन्यात भारतीय संघाची धुरा वाहिली. त्यापैकी ३३ सामन्यात भारताने विजय तर १२ सामन्यात पराभव पत्करला. तर, १० सामने अनिर्णित राखण्यात भारतीय संघाला यश लाभले. विराट आतापर्यंत भारताला सर्वाधिक कसोटी विजय मिळवून देणारा कर्णधार बनला आहे.
संबंधित बातम्या:
– कॅप्टनकूल धोनीची बाजी! टी२० पाठोपाठ आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम वनडे संघाचाही कर्णधार
– आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाचा कोहलीच किंग; या भारतीय फिरकीपटूलाही मिळाले स्थान
– दशकातील सर्वोत्तम आयसीसी महिला वनडे आणि टी२० संघ जाहीर, मितालीसह ‘या’ भारतीयांना मिळाले स्थान