भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या तीन दिवसात पावसानं बराच व्यत्यय आणला. पावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ अजिबात होऊ शकला नाही. मात्र आज चौथ्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला नाही. यानंतर खेळाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, भारताच्या पहिल्या डावात स्टार फलंदाज विराट कोहलीनं नवा इतिहास रचला आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 27,000 धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज बनला. कोहलीनं या बाबतीत सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांना मागे सोडलं आहे. विराट कोहलीनं 27,000 धावांचा आकडा गाठण्यासाठी 594 डाव खेळले. तर सचिन तेंडुलकरनं 623 डावांत ही कामगिरी केली होती. आता विराटनं मास्टर ब्लास्टरचा रेकॉर्ड मोडला आहे. या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आहे. त्यानं हा टप्पा गाठण्यासाठी या 648 डाव खेळले होते.
या सामन्यात विराट कोहलीची शानदार खेळी शाकीब अल हसननं संपुष्टात आणली. कोहलीचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. तो 35 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 47 धावा करून बाद झाला.
यापूर्वी चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं घरच्या मैदानावर 12,000 धावा पूर्ण केल्या होत्या. ही कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. कोहलीनं आपल्या 219व्या सामन्यात हा विक्रम केला होता. कोहलीने घरच्या मैदानावर 58.84 च्या सरासरीनं 12,000 धावा पूर्ण केल्या, ज्यात ३८ शतकं आणि 59 अर्धशतकांचा समावेश आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर सचिन तेंडुलकरनं 258 सामन्यांमध्ये 50.32 च्या सरासरीनं 14192 धावा केल्या, ज्यात 42 शतकं आणि 70 अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा –
22 वर्षीय यशस्वीची धमाल! सेहवागचा 16 वर्ष जुना रेकॉर्ड उद्ध्वस्त
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं प्रथमच घडलं, रोहित-यशस्वीच्या जोडीनं केला महापराक्रम!
IND vs BAN: रवींद्र जडेजाची ऐतिहासिक कामगिरी; कानपूर कसोटीत विक्रमांची मालिका…