मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात गुरुवारी (२२ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना झाला. या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळीसह एक मोठा विक्रम केला आहे.
राजस्थानने बेंगलोरला विजयासाठी १७८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीला उतरलेल्या विराटने ३४ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. याबरोबरच त्याने ५१ वी धाव घेताच आयपीएलमध्ये ६००० धावा पूर्ण केल्या. हा टप्पा पार करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी आयपीएलमध्ये कोणालाही ६००० धावा करता आलेल्या नाहीत. विराटने १९६ व्या आयपीएल सामन्यात खेळताना हा कारनामा केला आहे. यात त्याच्या ५ शतकांचा आणि ४० अर्धशतकांचाही समावेश आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत (२२ एप्रिलपर्यंत) विराट पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ५४४८ धावांसह सुरेश रैना आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ५४२८ धावांसह शिखर धवन आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे डेव्हिड वॉर्नर आणि रोहित शर्मा आहे. वॉर्नरने ५३८४ धावा केल्या आहेत. तर रोहितने ५३६८ धावा केल्या आहेत.
राजस्थानचे बेंगलोरला १७८ धावांचे आव्हान
या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, राजस्थानची सुरुवात अत्यंत खराब झाली. एका क्षणी राजस्थानची आवस्था ४३ धावांवर ४ बाद अशी झाली होती.
मात्र, त्यानंतर शिवम दुबेने रियान परागला साथीला घेत राजस्थानचा डाव सावरला. त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, १४ व्या षटकात रियान पराग २५ धावांवर हर्षल पटेलच्या तर १६ व्या षटकात शिवम दुबे ३२ चेंडूत ४६ धावा करुन केन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण असे असताना राहुल तेवतियाने आक्रमक खेळी करत २३ चेंडूत ४० धावांची खेळी केली. त्यामुळे राजस्थानला २० षटकात ९ बाद १७७ धावा करता आल्या आणि बेंगलोरला १७८ धावांचे आव्हान देता आले.
प्रतिउत्तरादाखल बेंगलोरकडून विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कलने सलामीलाच दमदार शतकी भागीदारी रचताना बेंगलोरच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादला मोठा धक्का; टी नटराजन उर्वरित आयपीएल २०२१ हंगामामधून बाहेर
अखेर हास्य फुलले!! हैदराबादच्या विजयाच्या क्षणी मालकीण काव्या मारन झाली भावूक, व्हिडिओ होतोय व्हायरल
रेकॉर्ड अलर्ट! मुंबई इंडियन्स नंतर ‘अशी’ कामगिरी केवळ दुसरा संघ बनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर