भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कसोटी मालिका नुकतीच संपली असून यजमानांनी १-० ने या मालिकेत बाजी मारली आहे. कानपूरमधील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर मुंबई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात मात्र भारताने ३७२ धावांनी न्यूझीलंडला पाणी पाजले. या सामना विजयासह भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नावे एका शानदार विक्रमाची नोंद झाली आहे. तो क्रिकेटविश्वातील पहिला असा क्रिकेटपटू ठरला आहे, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात प्रत्येकी ५० सामना विजयांचा भाग राहिला आहे.
हा ३३ वर्षीय फलंदाज आतापर्यंत भारताच्या ५० कसोटी, १५३ वनडे आणि ५९ टी२० सामना विजयांचा भाग राहिला आहे.
ही एकमेवाद्वितीय कामगिरी करणारा विराट (Virat Kohli) जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) (BCCI) त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई कसोटी विजयानंतरचा फोटो शेअर करत बीसीसीआयने लिहिले आहे की, “अभिनंदन विराट कोहली. क्रिकेट या खेळातील प्रत्येक स्वरुपात ५० सामने जिंकणारा पहिला आणि एकमेव खेळाडू.”
Congratulations @imVkohli. The first player with 50 international wins in each format of the game.#TeamIndia pic.twitter.com/51zC4hceku
— BCCI (@BCCI) December 6, 2021
दरम्यान मुंबई कसोटी सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, पहिल्या डावापासून भारताचे या सामन्यात वर्चस्व राहिले होते. प्रथम फलंदाजी करताना मयंक अगरवालच्या मॅरेथॉन खेळीच्या जोरावर भारताने ३२५ धावा फलकावर लावल्या होत्या. ४ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने त्याने या डावात १५० धावा जोडल्या होत्या. त्याला अष्टपैलू अक्षर पटेल याचीही चांगली साथ मिळाली होती. अक्षरने या सामन्यात ५२ धावा फटकावल्या होत्या. न्यूझीलंडकडून फिरकीपटू एजाज पटेलने सर्वाधिक १० विकेट्स घेत इतिहास रचला होता.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ केवळ ६२ धावा करू शकला होता. त्यानंतर भारताने न्यूझीलंडसा फॉलोऑन न देता फलंदाजीसाठी मैदानावर उतरायचे ठरवले होते. हा निर्णय अचूक ठरवत त्यांनी ७ बाद २७६ धावा अशी स्थिती असताना डाव घोषित केला आणि न्यूझीलंडला विजयासाठी ५४० धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक ६० धावा केल्या. परंतु त्याला इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने न्यूझीलंडचा डाव केवळ १६७ धावांवर गडगडला आणि भारताने विक्रमी ३७२ धावांच्या अंतराने सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा विजयाने शेवट, त्यानंतर टीम इंडिया केव्हा खेळणार पुढील सामना? घ्या जाणून
भारतीय संघाचा दिलदारपणा! कानपूर कसोटीनंतर आता वानखेडे स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनाही दिले मोठे बक्षीस