इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी (०२ सप्टेंबर) प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव १९१ धावांवर संपुष्ठात आला. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने ३ विकेट्स गमावत १९१ धावा केल्या आहेत. या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याने कर्णधार म्हणून एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
विराट हा बाहेरील देशात कर्णधार म्हणून १० किंवा त्याहून अधिक कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा पहिलाच भारतीय कर्णधार बनला आहे. याबाबतील त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पिछाडीवर सोडले आहे. त्याने इंग्लडविरुद्ध सर्वाधिक १० कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व केले आहे. त्याच्या खालोखाल धोनीनेही भारताबाहेर इंग्लडविरुद्धच ९ वेळा कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे.
तिसऱ्या क्रमांकावर भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर आहेत. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध ८ वेळेस भारताबाहेर भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. तर या यादीत चौथ्या क्रमांकावरही विराटच आहे. त्याने इंग्लंडव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया विरुद्ध सात कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्त्व केले आहे.
तत्पूर्वी, ओव्हल कसोटीत प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला सुरुवात चांगली करता आली नाही. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा (११), केएल राहुल (१७) आणि मध्य क्रमातील फलंदाज चेतेश्वर पुजारा (४), रिषभ पंत (९), अजिंक्य रहाणे (१४) रविंद्र जडेजा (१०) मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले. केवळ विराटने ५० धावा करत चिवट झुंज दिली.
जरी प्रमुख फलंदाज अपयशी ठरले तरीही, तळातल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या शार्दुल ठाकूरने मात्र आक्रमक फलंदाजी केली. त्याने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. त्यामुळे सामन्यातील भारतीय संघ पहिल्या डावात १९१ धावांपर्यंत मजल मारू शकला.
महत्त्वाच्या बातम्या-
मैदानातील कट्टर वैरींमध्ये ओव्हल कसोटीत दिसला ‘याराना’, कोहली-अँडरसनच्या फोटोंनी चर्चेला उधाण
सामन्यादरम्यान शास्त्रींना झोप अनावर, कोणाला पत्ता लागू नये म्हणून लढवली भन्नाट शक्कल!! फोटो व्हायरल
संयमी अर्धशतकासह कोहली धोनीवर ठरला वरचढ, बड्या विक्रमात बनला ‘कॅप्टन नंबर १’