विराट कोहली जेव्हाही मैदानात उतरतो, तेव्हा तो कोणता ना कोणता विक्रम आपल्या नावे करतो. सोमवारी आयपीएल 2024 मधील पंजाबविरुद्धच्या सामन्यातही त्यानं एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
विराट कोहली पुरुषांच्या टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय बनला आहे. त्यानं माजी दिग्गज क्रिकेटपटू सुरेश रैनाचा विक्रम मोडला. आरसीबीच्या या स्टार खेळाडूनं पंजाबविरुद्ध जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार शिखर धवन या दोघांचे झेल घेतले. यासह त्यानं हा मोठा विक्रम आपल्या नावे केला.
विराट कोहलीनं बेअरस्टोचा झेल घेताच रेकॉर्ड बुकमध्ये आपलं नाव नोंदवलं. मोहम्मद सिराजनx टाकलेल्या तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बेअरस्टोनं हवेत शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू उंच गेला आणि विराट कोहलीनं एक्स्ट्रा कव्हरवरून धाव घेत झेल घेतला. त्यानंतर 13व्या षटकात कोहलीनं लाँगऑफवर धवनचा झेल घेतला. यावेळी चेंडू ग्लेन मॅक्सवेलनं टाकला होता. कोहलीच्या खात्यात आता एकूण 174 झेल झाले आहेत. 172 झेलसह सुरेश रैना दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याच्यानंतर रोहित शर्मा (167) आहे.
पुरुषांच्या टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे भारतीय क्षेत्ररक्षक
174- विराट कोहली
172 – सुरेश रैना
167 – रोहित शर्मा
146- मनीष पांडे
136- सूर्यकुमार यादव
बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, आरसीबीनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. बेअरस्टोला केवळ 8 धावा करता आल्या. यानंतर धवन आणि प्रभसिमरन सिंग यांनी पदभार स्वीकारला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. नवव्या षटकात प्रभसिमरन मॅक्सवेलच्या जाळ्यात अडकून पायचीत झाला. त्यानं 25 धावा जोडल्या. धवनचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. त्यानं 37 चेंडूत 45 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोनला (17) मोठी खेळी खेळता आली नाही. त्याला 12व्या षटकात अल्झारी जोसेफनं पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पंजाबनं 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या.
आरसीबीनं हे लक्ष्य 19.2 षटकात 6 गडी गमावून गाठलं. विराट कोहलीनं 49 चेंडूत सर्वाधिक 77 धावा केल्या. अखेरच्या षटकांत दिनेश कार्तिक (10 चेंडूत 28 धावा) आणि महिपाल लोमरोर (8 चेंडूत 17 धावा) यांनी आरसीबीला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीला भेटण्यासाठी काहीही! मैदानाची सुरक्षा मोडून चाहता थेट क्रीजवर, पाहा VIDEO
IPL 2024 । अर्धशतकाच्या जोरावर विराटचा महाविक्रम, गेल आणि वॉर्नरनंतर अशी कामगिरी करणारा पहिलाच
कार्तिकच्या मॅच विनिंग चौकारने फुटला आरसीबीचा नारळ, पंजाबवर 4 विकेट्स राखून मात