भारत विरुद्ध इंग्लंडच्या बहुप्रतिक्षित मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होत आहे. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण चार सामने खेळवले जातील. या मालिकेसाठी दोन्ही संघ चेन्नईत पोहोचले असून २ फेब्रुवारीपासून ते सरावाला सुरुवात करतील.
दरम्यान, या मालिकेद्वारे भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पुनरागमन करणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून त्याने पहिल्या सामन्यानंतर पालकत्व रजेमुळे माघार घेतली होती. पुनरागमनानंतर दमदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल. मात्र त्याचबरोबर कोहलीला आगामी मालिकेत एक अनोखा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे.
एमएस धोनीचा विक्रम मोडण्याची संधी
या मालिकेत विराट भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम मोडू शकतो. घरच्या मैदानावर कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत कर्णधार म्हणून विराट कोहली आणि धोनी बरोबरीत आहेत. या दोघांनी आतापर्यंत ९-९ कसोटी मालिकेत भारताला विजय मिळवून दिला आहे.
मात्र जर कोहली इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकू शकला, तर मायदेशात सर्वाधिक कसोटी मालिका जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचेल. या यादीत धोनी आणि कोहलीनंतर माजी कर्णधार सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन प्रत्येकी ६-६ मालिका विजयांसह दुसऱ्या स्थानी आहेत.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी ही मालिका महत्वाची
दरम्यान, ही मालिका भारतासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने देखील महत्वाची आहे. भारताला या स्पर्धेच्या क्रमवारीतील अव्वल दोनमधील आपले स्थान पक्के करण्यासाठी इंग्लंड विरुद्ध दोन विजयांच्या फरकाने मालिका जिंकणे आवश्यक आहे. मात्र जर भारतीय संघ 3-0 अथवा 4-0 ने पराभूत झाला तर भारतीय संघाच्या अंतिम सामन्यात खेळण्याच्या आशा धुळीस मिळतील. इंग्लंडला अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवण्यासाठी 3-0 ने विजय मिळवणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या:
PAK vs SA : फिरकीच्या जाळ्यात फसला पाहुणा संघ, कराची कसोटीत पाकिस्तानचा दमदार विजय
क्वारंटाईनमध्येही कोहली घेतोय फिटनेसवर मेहनत, वर्कआउट करतानाचा व्हिडिओ केला शेअर